मी आणि माझे जिवलग मित्र ज्ञानेश्वर गायकवाड यांनी २००९ मध्ये घेतलेल्या, पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या मुलाखतीची हि आठवण. सदर मुलाखतीस शिवाजी विद्यापीठातर्फे 'वार्षिक नियतकालीन स्पर्धा २००९' मधील मुलाखत विभागातील प्रथम पारितोषिक मिळाले होते.
(मुलाखती मधील एक क्षण...) |
प्रकाशनासाठी प्राध्यापकांची नियुक्ती आटोपल्यानंतर वेळ आली ती विविध विभागासाठी विध्यार्थी प्रतिनिधी निवडण्याची. मी, ज्ञानेश्वर आणि आमच्या सोबतच्या बऱ्याच मित्रांची विविध विभागासाठी नियुक्ती करण्यात आली. असे विविध छोटे-मोठे प्रसंग आजही तसेच्या तसे आठवतात, पण त्यातील महत्वाची एक आठवण सांगावीशी वाटते ती म्हणजे, पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांची मुलाखत.
प्रकाशनासाठी प्रत्येकाच्या विविध गोष्टी सुरु होत्याच, कोणी नवीन काही लिहून देण्यास इच्छुक तर कोणी आपला 'Copy-Paste' जिंदाबाद… अश्यातच आम्हाला सांगण्यात आले की, एक चांगली मुलाखत आपल्याला ह्या वर्षीही प्रकाशित करावयाची आहे. त्यासंदर्भातील चर्चेनंतर ह्या वर्षी पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी (आण्णा) यांची मुलाखत घेण्याचे ठरले आणि ते काम सोपविण्यात आले मिलिंद डोंबाळे व ज्ञानेश्वर गायकवाड ह्या दोन विद्यार्थ्यांवर. सदर प्रश्नावलीसाठी श्री. पी. डी. कुलकर्णी सरांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. ज्ञानेश्वरचे शिक्षण हे वाळव्याला झाले असल्याने, त्याला पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी (आण्णा) यांच्या बद्दल सर्व माहिती होतीच पण प्रश्न होता त्यांच्या वेळेचा, कारण वृद्धापकाळाने ते जास्त कोणाशी भेटत नसत. अश्यावेळी आम्हांला मदत मिळाली ती ज्ञानेश्वरच्या वाळव्यातील श्री. पाटील सरांची.
मुलाखतीचा दिवस ठरविला गेला. मी आणि ज्ञानेश्वर आमची हिरो-होंडा (स्प्लेंडर प्लस) घेऊन आष्टयाहून वाळव्याला निघालो (ह्या हिरो-होंडा (स्प्लेंडर प्लस) चे एक वैशिष्ट म्हणजे, ह्याचे खरे मालक होते ते आमचे 'परममित्र' राहुल गाजी, परंतू हे वाहन दुधगाव वरून आष्टयाला आल्यावर त्याचे 'मालक' बदलले जायचे. नवीन मालक असायचे मिलिंद, ज्ञानेश्वर, विनोद, परेश आणि …. ) वाळव्यात पोहोचताच श्री. पाटील सरांची भेट घेतली व हुतात्मा संघाच्या कार्यालयाकडे निघालो. थोड्याच वेळात आम्ही कार्यालयात पोहोचलो. तेथील कर्मचार्यांनी सर्व माहिती घेतल्यानंतर आम्हाला एक एक दुधाचा पेला पिण्यास दिला. आण्णांना ही आत माहिती देण्यात आली आणि आम्हाला आण्णांच्या खोलीत जाण्याची परवानगी मिळाली. आण्णा ही थोड्या वेळात तेथे आले. वृद्धापकाळाने थोडी झुकलेली पण भरभक्कम आकृती आम्हासमोर अवतरली. आण्णांचे सुरवातीचे प्रश्न आम्हांला अनपेक्षित होते ते म्हणजे - जेवण केलात का ? (आम्ही जेवण करूनच आल्याचे सांगितल्या नंतर) दुध पिलात का ? (पुन्हा आम्हाला कळले की तिथे आलेल्या सर्वाना मोफत दुध व जेवण उपलब्ध असते) आम्ही होकारार्थी मान हलवल्यावरच आण्णांनी पुढील गोष्टीस सुरवात केली. मुलाखतीस सुरवात झाली, मी माझ्या मोबाईल मध्ये देखील त्याचे रेकॉर्डींग सुरु केले. १५ जुलै १९२२ या जन्म दिवासापासूनचे एकामागून एक प्रसंग आण्णा आम्हांला सांगत होते. अनेक मुद्धे जसे कि बालपण, सहकार चळवळ, इंग्रजांच्या खजिन्याची लुट, सध्याचे सामाजिक परिस्थिती, नाना पाटील यांचे कार्य, पाणी परिषद, स्वातंत्र्य लढ्यातील अविस्मरणीय प्रसंग अशा अनेक प्रसंगांची पूर्ण माहिती त्यांनी आम्हांला दिली. त्यांच्या ह्या कार्यामागील प्रेरणास्थान होत्या त्या त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई. एकेक प्रसंग ऐकून आम्ही खरच रोमांचित होत होतो. जवळपास एक तासाच्या वर चाललेल्या ह्या मुलाखतीत आण्णांनी त्यांचे संपूर्ण जीवन सांगितले. अनेक आघात, त्याग, देशप्रेम अश्या विविध गोष्टींनी भरलेले त्यांचे ते जीवन होते. त्यांनी दिलेला हा संदेश - 'कोठेही राहिला तरी जीवनात प्रामाणिक रहा व प्रामाणिक लोकांच्या साथीने अन्यायाविरुद्ध संघर्ष करा' अजूनही ते आण्णांचे बोल आठवतात. मुलाखत संपल्यावर आण्णांना नमस्कार करून आम्ही आष्टयाला परतलो. पण ते देशप्रेमाचे बोल मात्र मनात आणि डोक्यात घुमत होते.
थोड्याच दिवसांत आमच्या महाविद्यालयाचा वार्षिक अंक प्रकाशित करण्यात आला. त्या पूर्ण अंकासही विद्यापीठातर्फे प्रथम पारितोषिक मिळाले व आमच्या ह्या मुलाखतीला ही. पण काही क्षण मात्र न विसरण्यासारखेच असतात अशातलाच हा...
हे सर्व घडून पाच वर्षे होत आली पण आठवणी मात्र जश्याच्या-तश्या डोळ्यापुढे उभारतात. ह्या आठवणींत आपणांस ही सहभागी करून घेण्यासाठी केलेला हा प्रयत्न…
- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
No comments:
Post a Comment