सदरचा पोवाडा संगमनेर (अहमदनगर, महाराष्ट्र) येथील शाहीर अनंत फंदी यांनी लिहिला असून, त्यांच्यावर लिहिण्यात आलेल्या एका जुन्या पुस्तकात तो मला मिळाला. तो वाचकांसाठी मी येथे शाहीर अनंत फंदी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत उपलब्ध करून देत आहे.
सुभेदार यशवंत कन्हया सदा फत्ते करी तलवारी । सवाई यशवंतराव होळकर प्रसन्न मल्हारी हस्त शिरीं ॥ध्रुवपद॥
वडील नावकर मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । जे सावध होते परंतु सर्यत केली सरतासरती । भाऊ यशवंतराव बहादर ऐकून घ्याया ह्या कीर्ति । दोन लाख फौजेचा जमाव दों वर्षांमधिं घ्या गणती । बनकस कंपू पठाण कडिये फौजेमधिं नित्य झडती । मान भिडावून देति लढावुन टोपीवाले नाहीं गणती । नागोपंत सरदार शिपाई अनेक उमराव हे बाहेरी ॥सुभे०॥१॥
शहर पुण्याशीं यावें ऐसा विचार ठरला फौजेचा । दरकूच घेउनि आघाडी मुकाम केला फलटणचा । मागून दुसरा गोलपठाणशाह आमदखान मीरखानचा । मार्गीं येतां लढाई संग्राम झाला टोपीवाल्याचा । उद्यां लढाई दुसरी नेमिली आला हलकारा लष्करचा । खाशासुद्धां करुनि तयारी मुकाम केला जेजूरिचा किं मल्हाराचें दर्शन घ्यावें मग निर्दाळावे वैरी ॥सुभे०॥२॥
सोमवारच्या दिवशीं प्रातःकाळीं लढाई नेमिली । फत्तेसिंगमानी यांणीं तल्लख लिहून पाठविली । अशी लढाई करा म्हणावें मागें मोहरें नाहीं जाहली । टोपीवाले फार हरामी त्यांनीं बहु धुंद केली । सवाई यशवंतराव जाऊन अंगें तरवार चमकविली । दोन लाख फौजेमधिं जाऊन कणसापरि कत्तल केली । तमाम कंपू पळ सुटला चहूंकडे गेले हो पेंढारी ॥सुभे०॥३॥
सवाई मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । बेफाम होते परंतु भली केली सरतांसरती । सवाई यशवंतराव बहादर ऐकून ध्याव्या या कीर्ति । दोन लाख फौजेचा जमाव दोप्रहरांमधिं ध्या गणति । बंक कंपु पठाण कडवे फौजेमधिं नित्य झडती । मान भिडावून देती लुढावून टोपीवाले नाहीं गणती । फत्तेसिंग मान्या कुलअखत्यारी ऐकुनि घ्या या शूर मूर्ति । नागोपंत सरदार शिपाई अनेक उमराव हे बहिरी । जसा कृष्ण अवतार मुरारी गोपिकांवर कृपा करी ॥सुभे०॥४॥
सुभेदार महाराज प्रतापी नामें ऐक एक मोहोरा । कारभारी ऐकुनि घ्यावे हरनाथाचा कुलकल्ला । शहर पुण्याची नाकेबंदी वागुं देईना पसारा । खटमार मोठा कठिण नाहीं कुठें ऐकिली तर्हा । मार देउनि खंडण्या घेतो चौमुलखामधिं दरारा । वडिला वडिलीं पुरुषार्थ महिमा सवाई यशवंतराव जुरा । अनंद फंदीचे छंद ऐकतां लढाई झाली ही सारी । सुभेदार यशवंत कन्हया सदा फत्ते करी तलवारी । सवाई यशवंतराव होळकर प्रसन्न मल्हारी हस्त शिरीं ॥सुभे०॥५॥
No comments:
Post a Comment