Thursday, August 21, 2014

श्री खंडेरायांच्या प्रतिमेतील एक विरोधाभास...


महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत म्हणजेच श्री खंडोबा ! श्री खंडोबा नावाव्यतिरिक्तही मार्तंड, खंडेराय, मल्हार तसेच मल्हारलिंग या व अशा अनेक नावांनी महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राजवळील इतर राज्यात मोठया भक्तीभावाने पूजले जाणारे हे लोकदैवत आहे.

श्री खंडोबा म्हंटले की सर्वांच्या डोळ्यासमोर मणी-मल्ल दैत्यांचा वध करतानाची श्री खंडोबा आणि देवी म्हाळसा यांची अश्वारूढ प्रतिमा उभी राहते. श्री खंडेरायांचा कार्यकाल हा साधारणतः दहाव्या शतकातील मानला जातो, त्यामुळे सदर प्रतिमा ही प्रतीकात्मक व काल्पनिक असण्याची शक्यता आहे. पण तरीही, आपण थोडेसे श्री खंडेरायांच्या जीवनातील घटनांचा क्रमनिहाय विचार केल्यास सदर प्रतिमेतील एक विरोधाभास निदर्शनास येतो. जर मणी आणि मल्ल या दोन्ही दैत्यांचा वध श्री खंडेरायांनी देवी म्हाळसा यांच्याबरोबरच्या विवाहापूर्वीच केला असेल तर प्रतिमेत मणी-मल्ल वधाच्या क्षणी घोड्यावर श्री खंडेरायांच्या समवेत देवी म्हाळसा कशा असू शकतील. 'श्री मल्हारी महात्म्य' सुद्धा मणी-मल्ल वधाची घटना श्री खंडेराय आणि देवी म्हाळसा यांच्या विवाहापुर्वीचीच दर्शवते. डॉ. विठ्ठल ठोंबरे (श्री खंडोबाचे प्रबंधकार) सल्लागार असणाऱ्या  झी-मराठी वरील 'जय मल्हार' ही मालिकासुद्धा मणी-मल्ल वधाची घटना श्री खंडेराय आणि देवी म्हाळसा यांच्या विवाहापुर्वीचीच दर्शवते.

एकंदरीत विवाहापुर्वीच श्री खंडेरायांनी मणी-मल्ल दैत्यांचा वध केला व कालांतराने देवी म्हाळसा यांच्यासमवेत विवाह केला. त्यामुळे मणी-मल्ल दैत्यांचा वध करतानाची श्री खंडोबा आणि देवी म्हाळसा यांची अश्वारूढ प्रतिमा ही श्री खंडेरायांच्या जीवनातील घटनांचा क्रमनिहाय विचार केल्यास कितपत योग्य आहे असा प्रश्न पडतो.

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)

No comments:

Post a Comment