Sunday, December 27, 2015

​​'आम्ही धनगर' - कवितासंग्रह



प्राचीन काळापासून पशुपालन करणारा समाज, वैभवशाली आणि गौरवशाली इतिहास घडवणारा समाज, आपल्या पशुपालन या पारंपारिक व्यवसायामुळे सर्वत्र पसरलेला व तेथील भाषेनुसार वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा समाज आणि एवढ्या विविधतेत देखील आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेची एकोप्याने ठेवण करणारा समाज म्हणजेच धनगर समाज ! याच धनगर समाजातील काही महत्वाच्या व्यक्तिरेखा तसेच धनगर समाजाच्या सामाजिक जीवनावर विविध अंगानी रचलेल्या कवितांचा सचित्रसंग्रह म्हणजेच 'आम्ही धनगर'.

'ज्ञानकुंज प्रकाशन'तर्फे प्रकाशित 'आम्ही धनगर' या कवितासंग्रहात धनगर समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच ऐतिहासिक गोष्टींना प्रकाशमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सदर कवितासंग्रहामध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर, महाराणी अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, वीरांगना भीमाबाई होळकर, वीर शिंग्रोबा धनगर तसेच बापू बिरू वाटेगावकर यांच्यावरील कवितांचा समावेश आहे. धनगर समाजाचे प्रमुख कुलदैवत श्री खंडोबा यांच्यावरील दोन कविता देखील वाचकांना नक्की आवडतील. त्याचबरोबर धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या सामाजिक जीवनावरील काही कवितांचा समावेशही 'आम्ही धनगर' मध्ये करण्यात आला.      

  • पुस्तक - आम्ही धनगर     
  • कवी - मिलिंद डोंबाळे     
  • प्रकाशक - ज्ञानकुंज प्रकाशन     
  • भाषा - मराठी     
  • साहित्यप्रकार - कवितासंग्रह     ​
  • पृष्ठसंख्या - ८०​
  • स्वागतमुल्य - रु.१००/-

​वाचकांनी सदर कवितासंग्रह घरपोच मिळवण्यासाठी (+९१) ९४०४३५०५२८ / (+९१) ८९७५४९३५०५ या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचबरोबर 'आम्ही धनगर' हा कवितासंग्रह 'BookGanga' वरदेखील पुढील संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे - http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4743727610679215563?BookName=Amhi-Dhangar 

- मिलिंद डोंबाळे​

Thursday, December 24, 2015

​चित्रपट 'बाजीराव मस्तानी' आणि माहेश्वरचा 'अहिल्या फोर्ट'…



१८ डिसेंबर २०१५ रोजी 'बाजीराव मस्तानी' हा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला. मराठीतील प्रसिध्द लेखक ना.स.इनामदार यांच्या 'राऊ' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट प्रकाशनापूर्वी तसेच प्रकाशनानंतर ही अनेक कारणांनी प्रकाश झोतात राहिला.

सदर चित्रपटात बाजीराव पेशवे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यातील नात्याचाही उल्लेख एका दृश्यामध्ये दाखविण्यात आला आहेच. पण ह्या व्यतिरिक्तही एके ठिकाणी अहिल्यादेवींनी उभारलेल्या माहेश्वर येथील किल्ल्याचे 'अहिल्या फोर्ट'चे दृश्यही (थोडेसे बदल करुन) चित्रपटात पहावयास मिळते. चित्रपटात बुंदेलखंडच्या विजयानंतर बाजीराव पेशवे ज्यावेळी छत्रपतींना भेटावयास निघतात त्यावेळी दाखविण्यात आलेला महाल हा अहिल्यादेवींनी माहेश्वर येथे नर्मदेच्या काठावर उभारलेला 'अहिल्या फोर्ट' आहे.

या आधीही अनेक हिंदी तसेच तमिळ मधील चित्रपटांचे तसेच मालिकांचीही अनेक दृश्ये अहिल्यादेवींनी उभारलेल्या माहेश्वर येथील किल्ल्यात 'अहिल्या फोर्ट' येथे चित्रित करण्यात आली आहेतच. इतक्या वर्षांनंतर देखील होळकरशाहीच्या वैभवशाली ऐतिहासिक वास्तूंची लोकांना अशा अनेक माध्यमांतून प्रचीती मिळत राहणे ही आनंदाचीच बाब आहे. 

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)​

Tuesday, September 22, 2015

मराठी कविता - सुभेदार मल्हारराव होळकर​ (Subhedar Malharrao Holkar)


Milind Dombale (Deshmukh) Marathi Kavita Subhedar Malharrao Holkar
मिलिंद डोंबाळे (देशमुख) मराठी कविता सुभेदार मल्हारराव होळकर 

Wednesday, September 9, 2015

Shri Sant Ramjibaba (श्री संत रामजीबाबा)



पुणे शहराच्या लगतच चिंचवड गावापासून अगदी जवळच असलेल्या चांदखेड ता. मावळ या गावी पेशवाईचे काळात धनगर (खाटीक) या समाजात रामजीबाबा नावाचे एक संत पुरुष होऊन गेले. रामजीबाबांचा व्यवसाय म्हणजे मेंढरांचे पालन-पोषण करणे हा पिढीजात धंदा होता. खंडोबाची उपासना त्यांच्या घराण्यात परंपरेने चालू होती. त्या उपसनेमधूनच त्यांच्या ठिकाणी असे काही वैराग्य निर्माण झाले की, संसारी असून देखील ते विरागी बनले. प्रभूचिंतनात त्यांचा सर्व काळ जात असे व चिंतनामधूनच त्यांना ईश्वर प्राप्ती झाली.

रामजीबाबा हे चांदखेड गावातील घोलप घराण्यातील. घोलप घराणे खंडोबाचे भक्त होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चांदखेड या गावीच झाला. रामजीबाबांचा संसार मावळ तालुक्यातच होता. त्या भागातील लोकांना वाटले की, संत तुकारामांनंतर हा एक त्यांच्याच मार्गाने जाणारा कोणीतरी दिव्य साधुपुरुष आपल्यामध्ये आवतरला आहे. त्यामुळे तेथील लोक बाबांच्या भजनी लागले. रामजीबाबांनी त्यांच्या आयुष्यात काही चमत्कार केल्याचे दाखले नाहीत. परंतु एकही चमत्कार न करतां देखील केवळ भक्तीमार्गांमुळे हजारो लोक त्यांच्या भजनी लागले होते.

रामजीबाबांनी तुकाराम महाराजांचे प्रमाणेच प्रपंच साधून परमेश्वाची सेवा व आराधना केली. रामजीबाबांची ओळख त्यावेळच्या समाज बांधवांना पटली नाही. परंतु समाजाच्या अत्यंत कठीण अवस्थेत त्यांनी लोकांना धीर दिला व भक्तीमार्गाने संकटाला सामोरे जाण्याचे शिकवले. काही लोकांनी त्यांची अवहेलना केली परंतु संताना देखील काही काळ अनुकूल असावा लागतो. त्या काळात अनेक संत महात्मे होऊन गेले. रामजीबाबा हे खंडोबाचे परमभक्त म्हणून ओळखले जावू लागले. समाजाला मार्गदर्शन करुन त्यांनी खंडोबाची भक्ती करण्याचा उपदेश केला.

रामाजीबाबा यांनी चांदखेड या गावीच आपला देह ठेवला व ते वयाच्या ५४ व्या वर्षी खंडोबाचे चरणी विलीन झाले. तो दिवस म्हणजे पौष शुध्द पौर्णिमेचा होता. दरवर्षी या तिथीला रामजीबाबांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरी केली जाते. महाराष्ट्रात शेकडो भक्त त्याठिकाणी जमतात. भजन, कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतात. मुंबई येथील सर्वश्री बेंद्रे, खराटे, घोणे, घोडके या घराण्यातील लोक मोठ्या संख्येने येवून हा पुण्यतिथीचा सोहळा पार पडतात. समाजातील बाबांच्या भक्तांनीच चांदखेड येथील समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करुन भव्य सभा मंडप उभारला आहे.

अशा थोर संताचे चरणी आमचे विनम्र अभिवादन -  
पवित्र जे कुळ पावन तो देश । जेथे हरिचे दास जन्म घेती ।। 
कर्म धर्म त्याने झाला नारायण । त्याचेचि पावन तिन्ही लोक ।।  

संकलन - मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
www.milind-dombale.blogspot.com 
(टिप - सदरचा लेख मी लिहिला नसून, एका जुन्या पुस्तकात तो प्रकाशित झाला होता व ते पृष्ठ फक्त माझ्या हातीं लागले. प्रयत्न करुनही लेखक व पुस्तकाचे नाव कळू शकले नाही. जर कोणास लेखक किंवा पुस्तकासंबधी काही माहिती असल्यास जरुर कळवावे)

Saturday, September 5, 2015

Dr. Santuji Ramji Lad (डॉ. संतुजी रामजी लाड)

​​ 

डॉ. संतुजी रामजी लाड हे एक थोर समाजसेवक व नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले तसेच महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सोबत त्यांनी मोलाचे समाजकार्य केले. डॉ. संतुजी लाड यांच्या जीवनकार्यांचा घेतलेला हा एक संक्षिप्त आढावा; 

इ.स. १८४१ मध्ये एका खाटीक-धनगर कुटुंबात जन्मलेल्या संतुजी यांनी ठाण्याच्या मिशनरी शाळेत आपले शिक्षण घेतले. त्यानंतर डॉ. कीर्तीकर यांच्याकडे त्यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला व एक निष्णात डॉक्टर बनले. डॉ. संतुजी लाड यांच्या जीवनाचा अभ्यास करताना त्यांचा 'सत्यशोधक समाज' आणि 'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ' यांच्याशी आलेला संबंध व त्या माध्यमांतून ​​त्यांनी केलेले समाजकार्य यांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. 

डॉ. संतुजी लाड आणि सत्यशोधक समाज :
डॉ. संतुजी लाड यांच्या जीवनावर कायम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रभाव राहिला. त्याच विचारांमुळे डॉ. संतुजी लाड सत्यशोधक समाजाकडे आकर्षिले गेले आणि पुढे सत्यशोधक समाजाचे एक आघाडीचे नेते बनले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्षे समाजकार्य केले.​ सत्यशोधक समाजाच्या इ.स.१८८५ च्या ठाणे येथील वार्षिक उत्सवात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. नाशिक येथे इ.स.१९१२ साली भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या परिषदेचे ते अध्यक्ष होते. फुले यांच्या उपदेशाची सत्यता, उपयुक्तता व आवश्यकता यांचा आपल्यावर प्रभाव पडला व त्यानुसार आपण वर्तन करतो, असे त्यांनी म्हटले होते. ठाणे येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या तिसऱ्या अधिवेशनाचा खर्च डॉ. संतुजी लाड यांनी केला होता. 'दीनबंधू' ह्या साप्ताहिक मुखपत्र त्याकाळी चालविले जात असे. पण काही आर्थिक कारणांनी ते डबघाईला आले. त्यावेळी 'दीनबंधू' या वृत्तपत्राला त्यांनी आर्थिक मदत करून हे वृत्तपत्र बंद पडू दिले नाही. 'दीनबंधू' हे साप्ताहिक मुखपत्र पुन्हा नव्याने सुरु झाले, पण त्यासाठीं डॉ. संतुजी लाड यांना आपली सर्व संचित संपत्ति खर्चावी लागली होती. 'दीनबंधू'ने  इ.स.१८९६ च्या २३ फेब्रुवारीच्या अंकात डॉ. संतुजी लाड यांचा 'प्रथम-भाषणकार' असा उल्लेख केला होता. 

डॉ. संतुजी लाड आणि भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ:
महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यांसाठी स्थापन केलेल्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळामध्ये डॉ. संतुजी लाड हे एक महत्त्वाचे मार्गदर्शक व साहाय्यकारी होते. तसेच मंडळाच्या पाच आद्य संस्थापकांपैकी डॉ. संतुजी लाड हे एक होते. त्या पाच ही संस्थापकांची नावे व पदे पुढीलप्रमाणे ; १. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे (सरचिटणीस), २. सर नारायण चंदावरकर (अध्यक्ष), ३. शेठ दामोदरदास सुखडवाला (उपाध्यक्ष), ४. नारायणराव पंडित (खजीनदार) आणि ५. डॉ. संतुजी रामजी लाड (अधीक्षक). भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ अनेक सामाजिक तसेच प्रबोधनात्मक उपक्रम चालवत असे, त्याचाच भाग म्हणून मंडळाने इ.स. २२ नोव्हेंबर १९०६ ते इ.स.१९०८ च्या अखेर पर्यंत परळ येथे एक मोफत दवाखाना चालवला होता. ​​या दवाखान्यात डॉ. संतुजी लाड स्वतः रोज सकाळी ठाण्याहून स्वखर्चाने येत असत. त्यासाठीचा प्रवासखर्चही ते कधी मंडळाकडून घेत नसत. अस्पृश्तेचे प्रमाण त्या काळात अधिक होते. अस्पृश्य वर्गातील रोग्याला डॉक्टर साधे शिवूनही घेत नसत. पण त्या काळात डॉ. संतुजी लाड अस्पृश्य रोग्याला शिवून, अतिशय प्रेमळपणाने त्याची तपासणी करीत असत व उपचार करुन औषध देत असत. डॉ. संतुजी लाड यांच्या सेवावत्तीबद्दल व त्यांनी केलेल्या साहाय्याबद्दल महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांना फार कृतज्ञता वाटत होती. डॉ. संतुजी लाड ह्यांच्या जोडीने डॉ एस.पी.नाशिककर हे ही मंडळाच्या दवाखान्याचे काम पाहत असत. डॉ. संतुजी लाड केवळ दवाखान्यातच उपचार करत असत असे नव्हते, तर ते आजूबाजूच्या गरीब वस्तीतील घरांमध्ये जाऊन गरीब रोग्यांना मोफत औषधोपचार देखील करत असत. या वैद्यकीय कार्यांव्यतिरिक्त डॉ. संतुजी लाड यांनी ठाणे येथे रात्रीची शाळाही चालवली होती. 

डॉ. संतुजी लाड हे दीनदुबळ्यांना मदत करायला सदैव तत्पर असत. स्वभावाने अतिशय प्रेमळ असणारे डॉ. संतुजी लाड कोणीही संकटांत सापडला असे कळले की, त्याच्या साहाय्यासाठी धावत असत. आपल्या संपत्तीचा उपयोग  त्यांनी सार्वजनिक कामासाठी व गोरगरिबांच्या साहाय्यासाठीच केला. पंढरपूर ऑर्फनेजमधून त्यांनी दोन मुली समाजाकडून मागून घेतल्या व त्यांचें प्रतिपालन करून त्यांची लग्नेंही लावून दिली. सेवानिवृत्ती नंतरच्या काळात देखील मुंबई येथील मराठा प्लेग हॉस्पिटलमध्ये 'हाऊस-सर्जन' म्हणून त्यांनी काम केले. प्लेग हॉस्पिटलांत संपर्कात आलेल्या एका मुलाचे त्यांनी स्वतः उत्तम रीतीने संगापेन केले होते. अत्यंत निस्वार्थीपणाने समाजाची शेवटपर्यंत सेवा करणाऱ्या डॉ. संतुजी लाड यांचे कार्य वाखाण्याजोगेच आहे. अशा ह्या थोर समाजसेवकाचे इ.स. १९१६ च्या अखेरीस पक्षाघाताच्या विकाराने निधन झाले. 

डॉ. संतुजी लाड यासारख्या एका निस्वार्थी थोर समाजसेवकाचे कार्य आपणां सर्वांपर्यंत पोहोचावे एवढीच हा लेख लिहिण्यामागील माफक अपेक्षा ! 

- मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
http://milind-dombale.blogspot.qa/2015/09/blog-post.html

संदर्भ - 
१. Website - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई प्रस्तुत : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे -​ समग्र साहित्य 
२. Website - Prabodhankar K S Thackeray's Life & Literature, Official Website 
३. Book - 'Shahu Chhatrapati : A Royal Revolutionary' (1976) By Dhananjay Keer 
४. Book - Jotirao Phule (1996) By Tarkteerth Laxmishastri Joshi, Daya Agarval 
५. Book - 'Non-Brahman Movement In Maharashtra' (1989) By M.S.Gore

Friday, August 28, 2015

मल्हारतंत्र



श्रीमंत सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचा सपाट मैदानी प्रदेशातील गनिमीकावा अर्थात 'मल्हारतंत्र' ! 'सपाट मैदानी प्रदेशातील गनिमीकावा', ‘होळकरांचा-गनिमीकावा', 'होळकरी-कावा' किंवा 'मल्हारतंत्र' अशा अनेक नावांनी परिचित असलेला गनिमीकाव्याचा हा प्रकार 'मल्हारतंत्र' या नावानेच जास्त ओळखीचा आहे.

मल्हारबांच्या घोड्यांच्या टापांनी जवळपास अवघा भारत पिंजून काढला. मराठी साम्राज्याच्या विस्ताराचे गरुडस्तंभ ठरलेल्या मल्हाररावांनी अनेक युद्धात हेच तंत्र वापरले. दिल्लीच्या तख्तावर वर्चस्व ठेवले. त्यांच्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर यांनीही पुढे याचाच वापर केला. मॉन्सनचा भीषण पराभव हे देखील याचेच उदाहरण !

होळकरांच्या या तंत्राविषयी प्रसिद्ध इतिहासकार श्री. यशवंत वासुदेव खरे (ऐतिहासिक लेख संग्रह - १५) लिहितात  -  “होळकरांचा गनिमीकावा विचित्र होता.  मैदानात समोरासमोर इंग्रजाशी लढण्याच्या भानगडीत पडत नसे. पहिल्याने घोडेस्वाराच्या लहान लहान टोळ्या दिसू लागत या लहान टोळ्याच्या पाठीशी घोडेस्वाराच्या मोठमोठ्या टोळ्या असत. इंग्रजी फौज चालून आली तर हे घोडदळ पळू लागे. इंग्रजी फौजेची पाठ वळताच हजारो मराठे घोडेस्वार चहूकडून हल्ले करीत आणि पिछाडीवर लांडगेतोड करीत. शत्रूभोवती घिरट्या घाल घालून मराठे संधी सापडेल तेंव्हा शत्रूची कत्तल करीत...” (सदर पुरावा उपलब्ध करून दिला तो आमचे पुणे स्थित मित्र सचिन शेंडगे यांनी…)

प्रसिध्द इतिहास संशोधक व लेखक श्री. संजय सोनवणी यांचे देखील मल्हारतंत्राविषयी मत आपण जाणून घेऊयात, त्यांच्या 'धनगर-गवळ्यांच्या अवनतीचा कालखंड' या त्यांच्या प्रकाशित लेखामध्ये ते लिहितात - "मल्हाररावांनी उत्तर तुडवली. सपाट प्रदेशातील गनीमी कावा विकसीत केला...इतका कि त्याला "मल्हारतंत्र" म्हटले जाते. पानिपत युद्धात गेलेली मराठेशाहीचे पत काही महिन्यांत परत मिळवली. इंग्रजांनाही गनीमी काव्यानेच धुळ चारली."

तसेच श्री. संजय सोनवणी यांनी लिहिलेल्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या चरीत्र पुस्तकात ते लिहितात - "यशवंतरावांची युद्धनीती इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहिली. गनिमीकाव्याचा खरा उपयोग शिवरायांनंतर केला तो फक्त यशवंतरावांनी. गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशातच उपयुक्त असतो हे खोटे आहे, हे त्यांनी सिध्द करुन दाखवले. मॉन्सनचा भीषण पराभव हा गनिमीकाव्याचा खरेतर होळकरी-काव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युध्दशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषण व्हायला हवे. आधी शत्रूला आपल्या मागे आणून, मग त्याला उलटे पाळायला लावून, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवून, भर पावसाळ्यात गाळाच्या जमिनीत त्याची फजिती करत, तब्बल २५० मैल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत न्हेत कसे संपवावे, याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारां पेक्षाही अधिक ठार झाले."

तरी देखील गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशातच उपयुक्त असतो असे म्हणणाऱ्यांना काय म्हणावे ?

- मिलिंद डोंबाळे
www.milind-dombale.blogspot.com

Saturday, August 22, 2015

रायसीना-ग्राम और होलकर राजवंश

"इंदौर राज्य के होलकर राजवंश के १९११ तक के दस्तवेजोंसे यह ज्ञात होता है की दिल्ली का रायसीना ग्राम इंदौर राज्य के मालकी में सन १९११ तक था। सन १९११ में ही होलकर नरेशने इस रायसीना ग्रामको ब्रिटिश सरकार के अतीथ सोपा और आज हमारा राष्ट्रपती-भवन, संसद-भवन, सेक्रेट्रिएट की भव्य वास्तू हमारे इंदौर के होलकरोंके रायसीना ग्रामपर ही स्थापित है।"

- श्री. सुनील गणेश मतकर, 
संदर्भ- 'फुटी कोठी', आयुष अगरवाल द्वारा सन २०१४ में बनाई गई डॉक्युमेंट्री  

श्री. सुनील गणेश मतकर यह प्रसिध्द इतिहासकार डॉ. गणेश मतकरजी के पुत्र है। डॉ. गणेश मतकरजी ने 'होलकर राजवंश का २२० वर्षों का सांस्कृतिक, साहित्यिक और वाङ्ग्मयीन इतिहास' इस विषयपर सन १९९४ में प्रबंध लिखा और उसके लिए उन्हें डॉक्टरेट पदवी प्राप्त है। 

संकलन - मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
www.milind-dombale.blogspot.com

Wednesday, August 12, 2015

आषाढ अमावास्या (गटारी अमावास्या)

आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी येणारी अमावास्या 'आषाढ अमावास्या' म्हणून सर्वत्र ओळखली जाते. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात विविध नावांनी व विविध प्रकारे हा दिवस साजरा केला जातो. 
 
आषाढ अमावास्या ​कर्नाटकात 'भिमाना अमावास्या', आंध्रप्रदेशात 'चुक्कला अमावास्या', तामिळनाडू मध्ये 'चुक्कला अमावास्या व्रतम' या नावांनी साजरी केली जाते. गुजरात,राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश तसेच हिमाचल प्रदेश मध्ये हा दिवस 'हरियाली अमावस' म्हणून साजरा केला जातो. कर्नाटकात या दिवशी 'ज्योतीभिमेश्वर व्रत' तसेच 'पती-संजीवनी व्रत' पाळण्यात येतात तर उत्तर भारतातील काही शहरांत या दिवशी यात्रांचे आयोजनही करण्यात येते. तसेच काही ठिकाणी पितृपूजेसाठी हा दिवस शुभ मानला जातो तर काही ठिकाणी या दिवशी 'दिप पूजा' व 'पंच-महाभूत पूजा' केली जाते.
 
महाराष्ट्रात हा दिवस गटारी अमावास्या म्हणून साजरा करण्यात येतो. आषाढ अमावास्येनंतर येणाऱ्या श्रावण महिन्यात महाराष्ट्रातील बहुतांश लोक मांसाहार तसेच दारु सेवन वर्ज्य करतात. वैद्यकीयदृष्ट्या देखील ही गोष्ट योग्य मानली गेली आहे. श्रावण महिन्यात मान्सून (पावसाला) जोमात असतो व मानवी शरीरही अधिक संवेदनाक्षम असते, त्यामुळे जड (मांसाहार) आहार तसेच दारु सेवन वर्ज्य करणे आरोग्यासाठी फायदयाचेच ठरते. काही लोक आहाराचे प्रमाण कमी करण्यासाठी पूर्ण महिनाभर उपवास धरतात व हलक्या उपवासाच्या पदार्थांचेच सेवन करतात. पुढील महिनाभर मांसाहार व दारु सेवन वर्ज्य करावयाचे असल्यामुळे लोक या दिवशी अधिक प्रमाणात मांसाहार व दारु सेवन करुन हा दिवस साजरा करतात.
 
आषाढ अमावास्येच्या दिवशी लोक मांसाहार व दारु सेवन करुन 'त्याला' (श्रावण महिन्यात अनिष्ट मानल्या गेलेल्या आहाराला) पुढील महिनाभरासाठी निरोप देतात व श्रावण महिन्याच्या स्वागताला सज्ज होतात. गटारी अर्थात मांसाहार व दारु यांचे सेवन महिनाभरासाठी वर्ज्य करणे व अनिष्ट घटकांचे शरीरातून निःसारण करणे होय आणि म्हणूनच आषाढ अमावास्येला महाराष्ट्रात 'गटारी अमावास्या' म्हणून संबोधले व साजरे केले जाते.
 
(टिप - वरील सर्व माहिती विविध वेबसाईटसवर प्रकाशित झालेल्या लेखांमधून संकलित करण्यात आली आहे.)
 
मिलिंद डोंबाळे (देशमुख)
गुरुवार, दि - १३ ऑगस्ट २०१५

Monday, August 10, 2015

​'धनगर समाज-प्रबोधन' की 'सामाजिक-द्वेष' ?

आजकाल धनगर समाजातील अनेक बुद्धीजीवी तरुण समाज-प्रबोधनाकडे वळत आहेत व धनगर समाजाला जागे करण्याचा मनस्वी प्रयत्नही करत आहेत. सदरचे समाज-प्रबोधन हि काळाची गरज आहे यात काहीच शंका नाही. परंतू समाज-प्रबोधन करीत असताना धनगर समाज-प्रबोधनापेक्षा इतर समाजाप्रती / धर्मांप्रती द्वेषभावना पसरवण्यातच काहींना जास्त रस असल्याचे त्यांच्या लिखानावरुन जाणवते किंवा स्पष्ट होते. त्याचीच प्रचीती म्हणून 'धनगर विरुद्ध मराठा', 'धनगर विरुद्ध ब्राह्मण' तसेच 'धनगर विरुद्ध आदिवासी' हे व असे अनेक विषय रोज सर्रास वाचण्यास मिळतात. 

धनगर समाजाच्या सामाजिक मागासलेपणाचे सर्वच्या सर्व खापर ब्राह्मण समाजावर टाकून आपला धनगर समाज काळाच्या फार पाठीमागे राहिला, असे सांगत आमचे काही 'प्रबोधनकार' मित्र धन्यता मानतात. तर काही 'प्रबोधनकार' मित्र राजकीय मागासलेपणाचे सर्व खापर मराठा समाजावर टाकून विषयातून आपले हात पद्धतशीरपणे काढून घेतात. स्वतःच्या समाजाच्या चुकींवर पडदा टाकून त्या गोष्टींसाठी इतर समाजाला दोषी ठरवणे हे कितपत योग्य आहे ? याला समाज प्रबोधन म्हणावे का ?  

अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यास धनगर समाजास ब्राह्मणांनी रोखले होते का ? किंवा राजकारणात संघटीत होण्यासाठी धनगर समाजास मराठा समाजाने रोखले होते ? धनगर समाजाच्या मागासलेपणास अंशता इतर समाज कारणीभूत असतीलही, पण मुख्यत्वे ह्या सर्व गोष्टींसाठी धनगर समाजच स्वतः कारणीभूत आहे, हे एक कटूसत्य आहे. माझ्या मते कोणत्याही समाजाच्या अधोगतीला किंवा सामाजिक मागासलेपणाला इतर समाजापेक्षा / धर्मांपेक्षा स्वतः तो समाजच मुख्यत्वे कारणीभूत असतो. धनगर समाजाच्या बाबतीतही असेच काहीसे आहे.

माझ्या मते धनगर समाजाच्या आर्थिक, सामाजिक तसेच राजकीय मागासलेपणाची प्रमुख सहा कारणे आहेत, ती खालीलप्रमाणे; 
१. अशिक्षितपणा 
२. सामाजिक आणि राजकीय असंघटीतपणा 
३. अंधश्रद्धेवरील 'श्रद्धा' 
४. पारंपारिक व्यवसायामध्ये आधुनिकीकरणाचा अभाव 
५. सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीबाबतची उदासीनता 
६. स्वतःच्या गौरवशाली इतिहासाबाबतची उदासीनता

वरील प्रमुख सहा मुद्यांवर मात करुन धनगर समाज नक्कीच प्रगतीपथाकडे झेपावेल यात काहीच शंका नाही. हे सर्व प्रश्नं सोडविण्यासाठी धनगर समाजाने इतर समाजांवर आरोप न करता स्वपरीक्षण करून संघटीत प्रयत्न करणे गरजेचे आहे, तर आणि तरच धनगर समाज स्वतःच्या गौरवशाली इतिहासाची पुनुरावृत्ती करु शकेल. या कार्यात समाजातील बुद्धीजीवी प्रबोधनकारांकडून सकारात्मक मदतीची अपेक्षा करतो आणि धनगर समाजाच्या पुढील 'संघटीत' वाटचालीस शुभेच्छा देतो.

आता, उदाहरणासाठी आपण ब्राह्मण समाजाचा विचार करु. भारतीय लोकसंख्येत जवळपास फक्त ३% असणारा ब्राह्मण समाज आज भारताचा प्रधानमंत्री बदलण्याचे सामर्थ्य ठेवतो याचे कारण काय असू शकेल ? कारण तो सामाजिक तसेच राजकीय दृष्ट्या संघटीत आहे, साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. सामाजिक प्रश्नांसाठी सर्व समाज एक होतो. तसेच त्या समाजातील बुद्धीजीवी लोकांकडून त्यांच्या संघटना अतिशय प्रभावीपणे चालवल्या जातात. 

तेच महाराष्ट्रात १७% लोकसंख्या असलेला धनगर समाज राज्यातून एक खासदार निवडून आणून देऊ शकत नाही, याचे कारण काय असू शकेल ? धनगरांचे अनेक प्रश्न इतकी वर्षे प्रलंबित का ? तसेच अनुसूचित जमातीमधील अंमलबजावणी असेल किंवा सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरणाचा मुद्दा असेल किंवा चराऊ कुरणांचा प्रलंबित मुद्दा असेल किंवा असे इतर अनेक… इतकी वर्षे सर्वच मुद्दे अनूत्तरित आहेत. याला कारणीभूत कोण ? धनगर समाजातील संघतीटपणा आणि सुशिक्षितपणा (नुसते शिक्षण नव्हे) यांचा अभाव ही ह्या मागील प्रमुख करणे असू शकतील, असे माझे वयक्तिक मत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विकासाचे प्रमुख तीन मुद्दे सांगितले, ते असे - 'शिक्षण, संघर्ष आणि संघटन'. पण आपण त्यातील दोन मुद्दे (शिक्षण आणि संघटन) सोडून फक्त एका मुद्द्यानेच (संघर्ष) परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे यश मिळण्याची आशा तशी धुसर आहे. म्हणूनच धनगर समाजाने शिक्षण, संघर्ष आणि संघटन या तिन्ही मुद्द्यांसमवेत विकासाची ओढ धरावी. विजय नक्कीच आपला असेल.

धनगर समाजाच्या इतिहासाप्रती उदासीनतेवरही चर्चा होणे गरजेचे आहे. खऱ्या इतिहासाच्या नावाखाली ब्राह्मणद्वेष किंवा मराठाद्वेष पसरवण्याच्या घटनांची संपूर्ण महाराष्ट्राने याआधी दखल घेतलेलीच आहे. वाघ्या कुत्र्याचा मुद्दा असेल किंवा अहिल्यादेवींची तसेच तुकोजीराव होळकरांची बदनामी ही त्यातीलच काही निवडक उदाहरणे ! त्यामुळे खऱ्या इतिहासाच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या सामाजिकद्वेषाचा धनगर समाज बांधवांनी स्वतःच्या विवेक बुद्धीने विचार व पडताळणी करावी ही विनंती.

जय हिंद ! जय मल्हार !  

मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०१५ 

Wednesday, July 8, 2015

मराठी कविता - माणुसकी


मराठी कविता । माणुसकी । मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
Marathi Kavita । Manuski । Milind Dombale (Deshmukh)

Monday, June 8, 2015

बापू बिरू वाटेगावकर


मराठी कविता । बापू बिरू वाटेगावकर । मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
Marathi Kavita । Bapu Biru Vategaonkar । Milind Dombale (Deshmukh)