Monday, August 22, 2016

मराठी कविता - एकटाच...


Courtesy - Mr. Nilesh Shelake & Mr. Sukhdev Ekal
एकटाच । मराठी कविता । मिलिंद डोंबाळे (देशमुख)
Ektach । Marathi Kavita । Milind Dombale (Deshmukh)

Monday, May 23, 2016

​।। यशवंतायन ।।


एक रणझुंजार महायोद्धा, कनवाळू महाराजा, भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, जात-धर्म-प्रदेश यांच्या पलीकडे जाऊन देश-राष्ट्रहित पाहणारे देशप्रेमी या व अशा अनेक विशेषनांनी महाराजा यशवंतराव होळकर यांची ओळख आवघ्या जगाला आहे. आजपर्यंत अनेक प्रख्यात साहित्यिकांनी आपल्या लेखनीतून यशवंतरावांची रणकीर्ती जगासमोर मांडली आहे. त्यामध्ये शाहीरांचे योगदानही उल्लेखनीय असेच आहे.  

महाराजांचे समकालीन शाहीर हरी बाळा आणि शाहीर अनंत फंदी तसेच नंतरच्या काळातही आपल्या पोवाड्यांनी महाराजांची गौरवगाथा समाजापर्यंत पोहचवणारे शाहीर दु.आ.तिवारी, शाहीर पांडुरंग खाडिलकर आणि शाहीर अमर शेख यांचे आज दुर्मिळ झालेले पोवाडे "यशवंतायन"च्या माध्यमातून श्री. मिलिंद डोंबाळे (देशमुख) यांनी प्रकाशित केले आहेत, ही बाब इतिहासप्रेमींच्या दृष्टीने स्वागतार्थ आहे. ​ 

  • ​पुस्तक - यशवंतायन
  • संपादक - मिलिंद डोंबाळे (देशमुख)
  • प्रकाशक - ज्ञानकुंज प्रकाशन
  • भाषा - मराठी
  • साहित्यप्रकार - पोवाडा संग्रह
  • पृष्ठसंख्या - ६०​
  • स्वागतमुल्य - रु.६०/-

वाचकांनी सदर कवितासंग्रह घरपोच मिळवण्यासाठी (+९१) ९४०४३५०५२८ / (+९१) ८९७५४९३५०५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Monday, April 11, 2016

मराठी कविता - वीर विठोजीराव होळकर

श्रीमंत तुकोजीराव (प्रथम) होळकर यांचे तृतीय पुत्र व महाराजा यशवंतराव होळकर यांचे जेष्ठ बंधू विठोजीराव होळकर यांची पुण्यातील शनिवारवाड्यापुढे १६ एप्रिल १८०१ रोजी अतिशय क्रुरतेने हत्तीपायी देऊन हत्या करण्यात आली. त्याच घटनेवर आधारित ही रचना... 

# वीर विठोजीराव होळकर  #

पुण्यातील शनिवारवाड्यापुढे रक्त ज्यांचे सांडले
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।धृ।।   

शिंदे-पेशवे मिळूनी होळकरशाहीवर उलटले
पुण्यामध्ये मल्हाररावांना ठार त्यांनी हो केले
कसेतरी हो यशवंत-विठोजी तेथूनी निसटले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०१।।   

यशवंतरावांनी उत्तरेतूनी स्वातंत्र्यलढा आरंभला 
विठोजीरावांनी दक्षिण प्रदेश स्वतःकडे घेतला 
संधीच्या शोधात अनेक प्रांत पायदळी तुडवले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०२।। 

महाराष्ट्र-कर्नाटक-आंध्रावरी हो जावूनी धडकले
पंढरपूर-कुरकुंभ-मंगळवेढे मुक्त करुनी घेतले
विठोजीरावांनी बंडखोरीचे दक्षिणेत वादळ उठविले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०३।। 

इकडे पुण्यातील नीतीमत्ता पुरतीच ढासळली 
धनिकांच्या लुटीसंगे सामान्य जनताही त्रासली 
एकंदरीतच पुण्यामध्ये अराजकतेचे वारे वाहले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०४।। 

अनेक सरदार विठोजीरावांच्या पाठी उभे राहिले 
लढाया आलेले बावनपागे सैन्यातच सामील जाहले 
पेशव्यांच्या पानसे-पटवर्धनांचे पराभव हो गाजले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०५।। 

सैन्यासह विठोजीराव पुरंदर येथे पोहोचले
इंग्रजी फलटनींसह पेशव्यांनी फौजेस धाडले 
विठोजीरावांना पराभूत करूनी कैदेत हो घेतले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०६।। 

विठोजींना शनिवारवाड्यापुढे काढण्यासह आणले 
बाजीराव हा खेळ पाहण्यास नगारखान्यात बसले 
विठोजीरावांच्या अपमानाचे खेळ प्रथम चालवले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०७।। 

विठोजीरावांच्या पाठीवरती दोनशे कमचे ओढले 
रक्तरंजित पाठ पाहूनी पेशवे व इतर आनंदले 
मराठी दौलतीच्याच वीरावर असले क्रौर्य साधले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०८।। 

इतक्यात माहूत मैदानामध्ये हत्ती घेऊनी आले 
साखळदंडांनी विठोजीरावांना हत्तीपायी बांधले 
जखमांच्या असंख्य वेदनांसह ते फरफटू लागले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०९।। 

विठोजींच्या कुटुंबासमोरच  हा क्रुरखेळ चालविला 
पत्नीने पतीला वाचविण्यासाठी आक्रोश मांडिला  
दया न करता सर्वजण हो मृत्यूखेळ पाहत बसले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।१०।। 

जीवाचा हत्तीपायीं न येण्यासाठी आटापिटा चालिला 
मूर्च्छा येऊनी पडले तरीही मृत्यूखेळ सुरुच राहिला 
अंती हत्तीपायी शिर आल्याने विठोजींनी प्राण सोडले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।११।। 

खेळ विठोजींच्या विटंबनेचे नाही येथेच थांबले 
शव पुणेकरांच्या दृष्टीसुखासाठी मैदानातच ठेवले 
विठोजींचे शव मैदानातूनी दुसऱ्या दिवशी उचलले    
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।१२।। 

विठोजींच्या हत्येची बातमी यशवंतरावांस समजली 
मग यशवंतरावांनी दक्षिणेत आक्रमणे गाजवली 
पडसाद विठोजींच्या हत्येचे मराठी दौलतीस भोवले  
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।१३।। 

अजुनी मातीचा कणकण सांगे घडलेला इतिहास
वाचा फोडे विठोजीरावांवर झालेल्या अन्यायास
मिलिंदच्या लेखणीनी सदा सत्यइतिहासावर लिहले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।१४।।

© मिलिंद डोंबाळे (देशमुख)​
www.milind-dombale.blogspot.com​
-------------------------------------------------
Milind Dombale (Deshmukh) । Marathi Kavita । Veer Vithojirao Holkar
मिलिंद डोंबाळे (देशमुख) । मराठी कविता । वीर विठोजीराव होळकर 

Friday, March 25, 2016

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज आणि होळकर महाराजे

काही दिवसांपासून 'फर्ग्युसन कॉलेज, पुणे' मधील 'जमीन आणि मदत' या विषयांवर सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यामध्ये आणखीन एका मुद्द्याचा समावेश मी करु इच्छितो तो म्हणजे - तत्कालीन होळकरशाहीचे राजे, महाराजा शिवाजीराव होळकर (११ नोव्हेंबर १८५९ - १३ ऑक्टोबर १९०८) यांनी डेक्कन एज्युकेशनच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक मदत केली होती. तसेच फर्ग्युसन कॉलेजसाठी कोणतीही अट न घालता पुण्याचा होळकरांचा पिढीजात वाडा स्वतः होऊन देऊन टाकला होता.

होळकरशाहीचे गाढे अभ्यासक डॉ. गणेश मतकर त्यांच्या प्रबंधात लिहितात - "लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर या लोकसेवारत विद्वानांना इंदूरात समक्ष बोलावून आणि त्यांचा यथोचित सत्कार करुन त्यांच्या शैक्षणिक चळवळींना अपेक्षेबाहेरचे अर्थसाहाय्य केले. फर्ग्युसन कॉलेजकरिता कुठलीच अट न घालता आपला पुण्यातील पिढीजात वाडा आपण होऊन देऊन टाकला." (संदर्भ : होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास - डॉ. गणेश मतकर, पृष्ठ-२९२)

याव्यतिरिक्त, महाराजा शिवाजीराव होळकर यांच्यानंतर गादीवर आलेल्या महाराजा तुकोजीराव (तृतीय) होळकर यांनी सुद्धा ही परंपरा सुरुच ठेवली. महाराजा तुकोजीराव (तृतीय) होळकर यांनी फर्ग्युसन कॉलेजच्या बायो-लॉजिकल लायब्ररीकरिता १९१५-१६ मध्ये २०,००० रुपयांची भरघोस आर्थिक मदत केली. (संदर्भ : होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास - डॉ. गणेश मतकर, पृष्ठ-३२७)

पण, सध्याच्या एकाही चर्चेत महाराजा शिवाजीराव होळकर आणि महाराजा तुकोजीराव (तृतीय) होळकर यांचे साधे नाव देखील घेतले जात नाही.

काय म्हणावे ? काय करावे ? चालू द्यावे…

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
www.milind-dombale.blogspot.com

Monday, March 7, 2016

एक शोकांतिका…

आज जागतिक महिला दिनानिमित्त सोशल मेडियावर अनेक संदेश तसेच पोस्टर्स पहावयास मिळाले. त्यामध्ये भारतातील तसेच परदेशातील अनेक कर्तृत्वान महिलांचा उल्लेख होता. या माध्यमातून इतिहासातील कर्तृत्वान महिलांच्या कार्याचा जागर नव्याने समाजापुढे येतो, ही आनंदाचीच बाब आहे. पण त्यातील अतिशय खेदाची गोष्ट म्हणजे, अनेकांना (अक्षरश: काही सोडले तर सर्वांनाच) धनगर समाजातील किंवा होळकरशाहीतील कर्तृत्वान महिलांचा मात्र विसर पडलेला दिसतो. सदरच्या गोष्टीमागे समाजातील छुपी जातीयता ही प्रामुख्याने कारणीभूत आहे, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

ज्या स्त्रीने कुटुंबातील सर्वांच्या मृत्यूचे दु:ख पचवत तब्बल २८ वर्षे लोककल्याणकारी राज्य केले. तलवार हातात घेवून अनेकवेळा रणांगणात शत्रूला धूळ चारली. १८व्या शतकात रयतेसाठी अनेक नवीन लोककल्याणकारी संकल्पना सत्यात उतरविल्या. बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार तसेच संपूर्ण भारतात हजारो मंदिरांची उभारणी केली. सामान्य रयतेसाठी शेकडो अन्नछत्रे व पाणपोई यांची उभारणी केली, अशा एकमात्र पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा उल्लेख कर्तृत्वान महिलांच्या अनेक यादीत नसावा ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

बाळाच्या प्रेमापोटी रायगडासारखा अभेद्य किल्ला रात्री उतरून छत्रपती शिवरायांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणाऱ्या साहसी माता म्हणजेच वीर हिरकणी धनगर होय. यांच्याही साहसाचा समाजास विसर पडलेला दिसत आहे.

ज्यांनी पतीच्या मृत्यूनंतर आपल्या लहान मुलाला गादीवर बसवून अनेक वर्षे (१८११-१८१७) होळकरशाहीची सूत्रे समर्थपणे सांभाळली त्या म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पत्नी महाराणी तुळसाबाई होळकर होय. त्याचसोबत, ज्यांनी १८१८ मध्येच इंग्रजांशी सर्वकश युद्ध पुकारले अशा महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कन्या आद्य क्रांतीवीरांगना भीमाबाई होळकर यांचा उल्लेख ही आपल्याला सदरच्या विस्मृतीतील महिलांच्या यादीत करावा लागेल.

मित्रहो, कर्तृत्वान महिलांच्या यादीत धनगर समाजातील या व अशा अनेक महिलांचा समावेश होवू शकतो, परंतू जातीयतेच्या नजरेतून इतिहासाकडे पाहणाऱ्यांना कोण थांबवू शकेल ? सर्व बुद्धीजीवी समाजबांधवांनी एकत्र येवून या कर्तृत्वान महिलांच्या कार्याला प्रकाशित करून त्याचा यथोचित सन्मान करणे, म्हणजेच महिला दिनानिमित्त या सर्व कर्तृत्वान महिलांना केलेले खरेखुरे अभिवादन ठरेल.

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
(+९१)८९७५४९३५०५

Wednesday, January 27, 2016

मराठी कविता - महाराजा यशवंतराव होळकर

भारत भूमीच्या रक्षणाची, केली ज्यांनी गर्जना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।धृ।।

इंग्रजांना हरेक युद्धांत, ज्यांनी चारली हो माती
पळता भुई थोडी हे करती, इंग्रजांनी खाल्ली भीती
ज्यांच्या राष्ट्रकार्यामुळे, अभिमान वाटावा मना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०१।।

होळकरी काव्याने हे, महाराजा झुंजले किती
होळकरी बांडा झेंडा ज्यांनी, गाजविला भारती
ज्यांच्या पराक्रमापुढे झुकती, अजुनी सर्व माना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०२।।

एकाकी झुंजले परी, कधी नाही हार मानिली
सदा तलवारीच्या टोकावर, ज्यांनी आव्हाने पेलली
शिकवण ज्यांची सदा होती, ठेवा ताठ पाठीचा कणा
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०३।। 

देशभक्तीमुळे इतिहासात जे, अजरामर हो झाले
स्वातंत्र्याची प्रथम ठिणगी जे, मनी पेटवूनी गेले
ही स्तुतिसुमने वाहतो, मिलिंद ज्यांच्या चरणां
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०४।।​

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)

'आम्ही धनगर' या कवितासंग्रहातून…

Saturday, January 2, 2016

मराठी कविता - पेटवूया मशाल क्रांतीची


। Milind Dombale । Marathi Kavita ।  Petavuya Mashal Krantichi । 
। मिलिंद डोंबाळे । मराठी कविता । पेटवूया मशाल क्रांतीची​ ।​