Monday, April 11, 2016

मराठी कविता - वीर विठोजीराव होळकर

श्रीमंत तुकोजीराव (प्रथम) होळकर यांचे तृतीय पुत्र व महाराजा यशवंतराव होळकर यांचे जेष्ठ बंधू विठोजीराव होळकर यांची पुण्यातील शनिवारवाड्यापुढे १६ एप्रिल १८०१ रोजी अतिशय क्रुरतेने हत्तीपायी देऊन हत्या करण्यात आली. त्याच घटनेवर आधारित ही रचना... 

# वीर विठोजीराव होळकर  #

पुण्यातील शनिवारवाड्यापुढे रक्त ज्यांचे सांडले
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।धृ।।   

शिंदे-पेशवे मिळूनी होळकरशाहीवर उलटले
पुण्यामध्ये मल्हाररावांना ठार त्यांनी हो केले
कसेतरी हो यशवंत-विठोजी तेथूनी निसटले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०१।।   

यशवंतरावांनी उत्तरेतूनी स्वातंत्र्यलढा आरंभला 
विठोजीरावांनी दक्षिण प्रदेश स्वतःकडे घेतला 
संधीच्या शोधात अनेक प्रांत पायदळी तुडवले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०२।। 

महाराष्ट्र-कर्नाटक-आंध्रावरी हो जावूनी धडकले
पंढरपूर-कुरकुंभ-मंगळवेढे मुक्त करुनी घेतले
विठोजीरावांनी बंडखोरीचे दक्षिणेत वादळ उठविले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०३।। 

इकडे पुण्यातील नीतीमत्ता पुरतीच ढासळली 
धनिकांच्या लुटीसंगे सामान्य जनताही त्रासली 
एकंदरीतच पुण्यामध्ये अराजकतेचे वारे वाहले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०४।। 

अनेक सरदार विठोजीरावांच्या पाठी उभे राहिले 
लढाया आलेले बावनपागे सैन्यातच सामील जाहले 
पेशव्यांच्या पानसे-पटवर्धनांचे पराभव हो गाजले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०५।। 

सैन्यासह विठोजीराव पुरंदर येथे पोहोचले
इंग्रजी फलटनींसह पेशव्यांनी फौजेस धाडले 
विठोजीरावांना पराभूत करूनी कैदेत हो घेतले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०६।। 

विठोजींना शनिवारवाड्यापुढे काढण्यासह आणले 
बाजीराव हा खेळ पाहण्यास नगारखान्यात बसले 
विठोजीरावांच्या अपमानाचे खेळ प्रथम चालवले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०७।। 

विठोजीरावांच्या पाठीवरती दोनशे कमचे ओढले 
रक्तरंजित पाठ पाहूनी पेशवे व इतर आनंदले 
मराठी दौलतीच्याच वीरावर असले क्रौर्य साधले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०८।। 

इतक्यात माहूत मैदानामध्ये हत्ती घेऊनी आले 
साखळदंडांनी विठोजीरावांना हत्तीपायी बांधले 
जखमांच्या असंख्य वेदनांसह ते फरफटू लागले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०९।। 

विठोजींच्या कुटुंबासमोरच  हा क्रुरखेळ चालविला 
पत्नीने पतीला वाचविण्यासाठी आक्रोश मांडिला  
दया न करता सर्वजण हो मृत्यूखेळ पाहत बसले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।१०।। 

जीवाचा हत्तीपायीं न येण्यासाठी आटापिटा चालिला 
मूर्च्छा येऊनी पडले तरीही मृत्यूखेळ सुरुच राहिला 
अंती हत्तीपायी शिर आल्याने विठोजींनी प्राण सोडले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।११।। 

खेळ विठोजींच्या विटंबनेचे नाही येथेच थांबले 
शव पुणेकरांच्या दृष्टीसुखासाठी मैदानातच ठेवले 
विठोजींचे शव मैदानातूनी दुसऱ्या दिवशी उचलले    
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।१२।। 

विठोजींच्या हत्येची बातमी यशवंतरावांस समजली 
मग यशवंतरावांनी दक्षिणेत आक्रमणे गाजवली 
पडसाद विठोजींच्या हत्येचे मराठी दौलतीस भोवले  
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।१३।। 

अजुनी मातीचा कणकण सांगे घडलेला इतिहास
वाचा फोडे विठोजीरावांवर झालेल्या अन्यायास
मिलिंदच्या लेखणीनी सदा सत्यइतिहासावर लिहले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।१४।।

© मिलिंद डोंबाळे (देशमुख)​
www.milind-dombale.blogspot.com​
-------------------------------------------------
Milind Dombale (Deshmukh) । Marathi Kavita । Veer Vithojirao Holkar
मिलिंद डोंबाळे (देशमुख) । मराठी कविता । वीर विठोजीराव होळकर 

No comments:

Post a Comment