Friday, March 25, 2016

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज आणि होळकर महाराजे

काही दिवसांपासून 'फर्ग्युसन कॉलेज, पुणे' मधील 'जमीन आणि मदत' या विषयांवर सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यामध्ये आणखीन एका मुद्द्याचा समावेश मी करु इच्छितो तो म्हणजे - तत्कालीन होळकरशाहीचे राजे, महाराजा शिवाजीराव होळकर (११ नोव्हेंबर १८५९ - १३ ऑक्टोबर १९०८) यांनी डेक्कन एज्युकेशनच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक मदत केली होती. तसेच फर्ग्युसन कॉलेजसाठी कोणतीही अट न घालता पुण्याचा होळकरांचा पिढीजात वाडा स्वतः होऊन देऊन टाकला होता.

होळकरशाहीचे गाढे अभ्यासक डॉ. गणेश मतकर त्यांच्या प्रबंधात लिहितात - "लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर या लोकसेवारत विद्वानांना इंदूरात समक्ष बोलावून आणि त्यांचा यथोचित सत्कार करुन त्यांच्या शैक्षणिक चळवळींना अपेक्षेबाहेरचे अर्थसाहाय्य केले. फर्ग्युसन कॉलेजकरिता कुठलीच अट न घालता आपला पुण्यातील पिढीजात वाडा आपण होऊन देऊन टाकला." (संदर्भ : होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास - डॉ. गणेश मतकर, पृष्ठ-२९२)

याव्यतिरिक्त, महाराजा शिवाजीराव होळकर यांच्यानंतर गादीवर आलेल्या महाराजा तुकोजीराव (तृतीय) होळकर यांनी सुद्धा ही परंपरा सुरुच ठेवली. महाराजा तुकोजीराव (तृतीय) होळकर यांनी फर्ग्युसन कॉलेजच्या बायो-लॉजिकल लायब्ररीकरिता १९१५-१६ मध्ये २०,००० रुपयांची भरघोस आर्थिक मदत केली. (संदर्भ : होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास - डॉ. गणेश मतकर, पृष्ठ-३२७)

पण, सध्याच्या एकाही चर्चेत महाराजा शिवाजीराव होळकर आणि महाराजा तुकोजीराव (तृतीय) होळकर यांचे साधे नाव देखील घेतले जात नाही.

काय म्हणावे ? काय करावे ? चालू द्यावे…

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
www.milind-dombale.blogspot.com

Monday, March 7, 2016

एक शोकांतिका…

आज जागतिक महिला दिनानिमित्त सोशल मेडियावर अनेक संदेश तसेच पोस्टर्स पहावयास मिळाले. त्यामध्ये भारतातील तसेच परदेशातील अनेक कर्तृत्वान महिलांचा उल्लेख होता. या माध्यमातून इतिहासातील कर्तृत्वान महिलांच्या कार्याचा जागर नव्याने समाजापुढे येतो, ही आनंदाचीच बाब आहे. पण त्यातील अतिशय खेदाची गोष्ट म्हणजे, अनेकांना (अक्षरश: काही सोडले तर सर्वांनाच) धनगर समाजातील किंवा होळकरशाहीतील कर्तृत्वान महिलांचा मात्र विसर पडलेला दिसतो. सदरच्या गोष्टीमागे समाजातील छुपी जातीयता ही प्रामुख्याने कारणीभूत आहे, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

ज्या स्त्रीने कुटुंबातील सर्वांच्या मृत्यूचे दु:ख पचवत तब्बल २८ वर्षे लोककल्याणकारी राज्य केले. तलवार हातात घेवून अनेकवेळा रणांगणात शत्रूला धूळ चारली. १८व्या शतकात रयतेसाठी अनेक नवीन लोककल्याणकारी संकल्पना सत्यात उतरविल्या. बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार तसेच संपूर्ण भारतात हजारो मंदिरांची उभारणी केली. सामान्य रयतेसाठी शेकडो अन्नछत्रे व पाणपोई यांची उभारणी केली, अशा एकमात्र पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा उल्लेख कर्तृत्वान महिलांच्या अनेक यादीत नसावा ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

बाळाच्या प्रेमापोटी रायगडासारखा अभेद्य किल्ला रात्री उतरून छत्रपती शिवरायांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणाऱ्या साहसी माता म्हणजेच वीर हिरकणी धनगर होय. यांच्याही साहसाचा समाजास विसर पडलेला दिसत आहे.

ज्यांनी पतीच्या मृत्यूनंतर आपल्या लहान मुलाला गादीवर बसवून अनेक वर्षे (१८११-१८१७) होळकरशाहीची सूत्रे समर्थपणे सांभाळली त्या म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पत्नी महाराणी तुळसाबाई होळकर होय. त्याचसोबत, ज्यांनी १८१८ मध्येच इंग्रजांशी सर्वकश युद्ध पुकारले अशा महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कन्या आद्य क्रांतीवीरांगना भीमाबाई होळकर यांचा उल्लेख ही आपल्याला सदरच्या विस्मृतीतील महिलांच्या यादीत करावा लागेल.

मित्रहो, कर्तृत्वान महिलांच्या यादीत धनगर समाजातील या व अशा अनेक महिलांचा समावेश होवू शकतो, परंतू जातीयतेच्या नजरेतून इतिहासाकडे पाहणाऱ्यांना कोण थांबवू शकेल ? सर्व बुद्धीजीवी समाजबांधवांनी एकत्र येवून या कर्तृत्वान महिलांच्या कार्याला प्रकाशित करून त्याचा यथोचित सन्मान करणे, म्हणजेच महिला दिनानिमित्त या सर्व कर्तृत्वान महिलांना केलेले खरेखुरे अभिवादन ठरेल.

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
(+९१)८९७५४९३५०५