Wednesday, August 12, 2015

आषाढ अमावास्या (गटारी अमावास्या)

आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी येणारी अमावास्या 'आषाढ अमावास्या' म्हणून सर्वत्र ओळखली जाते. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात विविध नावांनी व विविध प्रकारे हा दिवस साजरा केला जातो. 
 
आषाढ अमावास्या ​कर्नाटकात 'भिमाना अमावास्या', आंध्रप्रदेशात 'चुक्कला अमावास्या', तामिळनाडू मध्ये 'चुक्कला अमावास्या व्रतम' या नावांनी साजरी केली जाते. गुजरात,राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश तसेच हिमाचल प्रदेश मध्ये हा दिवस 'हरियाली अमावस' म्हणून साजरा केला जातो. कर्नाटकात या दिवशी 'ज्योतीभिमेश्वर व्रत' तसेच 'पती-संजीवनी व्रत' पाळण्यात येतात तर उत्तर भारतातील काही शहरांत या दिवशी यात्रांचे आयोजनही करण्यात येते. तसेच काही ठिकाणी पितृपूजेसाठी हा दिवस शुभ मानला जातो तर काही ठिकाणी या दिवशी 'दिप पूजा' व 'पंच-महाभूत पूजा' केली जाते.
 
महाराष्ट्रात हा दिवस गटारी अमावास्या म्हणून साजरा करण्यात येतो. आषाढ अमावास्येनंतर येणाऱ्या श्रावण महिन्यात महाराष्ट्रातील बहुतांश लोक मांसाहार तसेच दारु सेवन वर्ज्य करतात. वैद्यकीयदृष्ट्या देखील ही गोष्ट योग्य मानली गेली आहे. श्रावण महिन्यात मान्सून (पावसाला) जोमात असतो व मानवी शरीरही अधिक संवेदनाक्षम असते, त्यामुळे जड (मांसाहार) आहार तसेच दारु सेवन वर्ज्य करणे आरोग्यासाठी फायदयाचेच ठरते. काही लोक आहाराचे प्रमाण कमी करण्यासाठी पूर्ण महिनाभर उपवास धरतात व हलक्या उपवासाच्या पदार्थांचेच सेवन करतात. पुढील महिनाभर मांसाहार व दारु सेवन वर्ज्य करावयाचे असल्यामुळे लोक या दिवशी अधिक प्रमाणात मांसाहार व दारु सेवन करुन हा दिवस साजरा करतात.
 
आषाढ अमावास्येच्या दिवशी लोक मांसाहार व दारु सेवन करुन 'त्याला' (श्रावण महिन्यात अनिष्ट मानल्या गेलेल्या आहाराला) पुढील महिनाभरासाठी निरोप देतात व श्रावण महिन्याच्या स्वागताला सज्ज होतात. गटारी अर्थात मांसाहार व दारु यांचे सेवन महिनाभरासाठी वर्ज्य करणे व अनिष्ट घटकांचे शरीरातून निःसारण करणे होय आणि म्हणूनच आषाढ अमावास्येला महाराष्ट्रात 'गटारी अमावास्या' म्हणून संबोधले व साजरे केले जाते.
 
(टिप - वरील सर्व माहिती विविध वेबसाईटसवर प्रकाशित झालेल्या लेखांमधून संकलित करण्यात आली आहे.)
 
मिलिंद डोंबाळे (देशमुख)
गुरुवार, दि - १३ ऑगस्ट २०१५

2 comments: