Monday, August 10, 2015

​'धनगर समाज-प्रबोधन' की 'सामाजिक-द्वेष' ?

आजकाल धनगर समाजातील अनेक बुद्धीजीवी तरुण समाज-प्रबोधनाकडे वळत आहेत व धनगर समाजाला जागे करण्याचा मनस्वी प्रयत्नही करत आहेत. सदरचे समाज-प्रबोधन हि काळाची गरज आहे यात काहीच शंका नाही. परंतू समाज-प्रबोधन करीत असताना धनगर समाज-प्रबोधनापेक्षा इतर समाजाप्रती / धर्मांप्रती द्वेषभावना पसरवण्यातच काहींना जास्त रस असल्याचे त्यांच्या लिखानावरुन जाणवते किंवा स्पष्ट होते. त्याचीच प्रचीती म्हणून 'धनगर विरुद्ध मराठा', 'धनगर विरुद्ध ब्राह्मण' तसेच 'धनगर विरुद्ध आदिवासी' हे व असे अनेक विषय रोज सर्रास वाचण्यास मिळतात. 

धनगर समाजाच्या सामाजिक मागासलेपणाचे सर्वच्या सर्व खापर ब्राह्मण समाजावर टाकून आपला धनगर समाज काळाच्या फार पाठीमागे राहिला, असे सांगत आमचे काही 'प्रबोधनकार' मित्र धन्यता मानतात. तर काही 'प्रबोधनकार' मित्र राजकीय मागासलेपणाचे सर्व खापर मराठा समाजावर टाकून विषयातून आपले हात पद्धतशीरपणे काढून घेतात. स्वतःच्या समाजाच्या चुकींवर पडदा टाकून त्या गोष्टींसाठी इतर समाजाला दोषी ठरवणे हे कितपत योग्य आहे ? याला समाज प्रबोधन म्हणावे का ?  

अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यास धनगर समाजास ब्राह्मणांनी रोखले होते का ? किंवा राजकारणात संघटीत होण्यासाठी धनगर समाजास मराठा समाजाने रोखले होते ? धनगर समाजाच्या मागासलेपणास अंशता इतर समाज कारणीभूत असतीलही, पण मुख्यत्वे ह्या सर्व गोष्टींसाठी धनगर समाजच स्वतः कारणीभूत आहे, हे एक कटूसत्य आहे. माझ्या मते कोणत्याही समाजाच्या अधोगतीला किंवा सामाजिक मागासलेपणाला इतर समाजापेक्षा / धर्मांपेक्षा स्वतः तो समाजच मुख्यत्वे कारणीभूत असतो. धनगर समाजाच्या बाबतीतही असेच काहीसे आहे.

माझ्या मते धनगर समाजाच्या आर्थिक, सामाजिक तसेच राजकीय मागासलेपणाची प्रमुख सहा कारणे आहेत, ती खालीलप्रमाणे; 
१. अशिक्षितपणा 
२. सामाजिक आणि राजकीय असंघटीतपणा 
३. अंधश्रद्धेवरील 'श्रद्धा' 
४. पारंपारिक व्यवसायामध्ये आधुनिकीकरणाचा अभाव 
५. सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीबाबतची उदासीनता 
६. स्वतःच्या गौरवशाली इतिहासाबाबतची उदासीनता

वरील प्रमुख सहा मुद्यांवर मात करुन धनगर समाज नक्कीच प्रगतीपथाकडे झेपावेल यात काहीच शंका नाही. हे सर्व प्रश्नं सोडविण्यासाठी धनगर समाजाने इतर समाजांवर आरोप न करता स्वपरीक्षण करून संघटीत प्रयत्न करणे गरजेचे आहे, तर आणि तरच धनगर समाज स्वतःच्या गौरवशाली इतिहासाची पुनुरावृत्ती करु शकेल. या कार्यात समाजातील बुद्धीजीवी प्रबोधनकारांकडून सकारात्मक मदतीची अपेक्षा करतो आणि धनगर समाजाच्या पुढील 'संघटीत' वाटचालीस शुभेच्छा देतो.

आता, उदाहरणासाठी आपण ब्राह्मण समाजाचा विचार करु. भारतीय लोकसंख्येत जवळपास फक्त ३% असणारा ब्राह्मण समाज आज भारताचा प्रधानमंत्री बदलण्याचे सामर्थ्य ठेवतो याचे कारण काय असू शकेल ? कारण तो सामाजिक तसेच राजकीय दृष्ट्या संघटीत आहे, साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. सामाजिक प्रश्नांसाठी सर्व समाज एक होतो. तसेच त्या समाजातील बुद्धीजीवी लोकांकडून त्यांच्या संघटना अतिशय प्रभावीपणे चालवल्या जातात. 

तेच महाराष्ट्रात १७% लोकसंख्या असलेला धनगर समाज राज्यातून एक खासदार निवडून आणून देऊ शकत नाही, याचे कारण काय असू शकेल ? धनगरांचे अनेक प्रश्न इतकी वर्षे प्रलंबित का ? तसेच अनुसूचित जमातीमधील अंमलबजावणी असेल किंवा सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरणाचा मुद्दा असेल किंवा चराऊ कुरणांचा प्रलंबित मुद्दा असेल किंवा असे इतर अनेक… इतकी वर्षे सर्वच मुद्दे अनूत्तरित आहेत. याला कारणीभूत कोण ? धनगर समाजातील संघतीटपणा आणि सुशिक्षितपणा (नुसते शिक्षण नव्हे) यांचा अभाव ही ह्या मागील प्रमुख करणे असू शकतील, असे माझे वयक्तिक मत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विकासाचे प्रमुख तीन मुद्दे सांगितले, ते असे - 'शिक्षण, संघर्ष आणि संघटन'. पण आपण त्यातील दोन मुद्दे (शिक्षण आणि संघटन) सोडून फक्त एका मुद्द्यानेच (संघर्ष) परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे यश मिळण्याची आशा तशी धुसर आहे. म्हणूनच धनगर समाजाने शिक्षण, संघर्ष आणि संघटन या तिन्ही मुद्द्यांसमवेत विकासाची ओढ धरावी. विजय नक्कीच आपला असेल.

धनगर समाजाच्या इतिहासाप्रती उदासीनतेवरही चर्चा होणे गरजेचे आहे. खऱ्या इतिहासाच्या नावाखाली ब्राह्मणद्वेष किंवा मराठाद्वेष पसरवण्याच्या घटनांची संपूर्ण महाराष्ट्राने याआधी दखल घेतलेलीच आहे. वाघ्या कुत्र्याचा मुद्दा असेल किंवा अहिल्यादेवींची तसेच तुकोजीराव होळकरांची बदनामी ही त्यातीलच काही निवडक उदाहरणे ! त्यामुळे खऱ्या इतिहासाच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या सामाजिकद्वेषाचा धनगर समाज बांधवांनी स्वतःच्या विवेक बुद्धीने विचार व पडताळणी करावी ही विनंती.

जय हिंद ! जय मल्हार !  

मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०१५ 

No comments:

Post a Comment