Tuesday, December 10, 2013

एक प्रभावी उपदेश...


जागतिक इतिहासात उत्कृष्ट प्रशासिका अशी ​नोंद असणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेल्या एका प्रभावी उपदेशाचे उदाहरण येथे देत आहे.

महाराष्ट्रातील संगमनेर मधील कवी अनंत फंदी, हे कविता तसेच तमाशा करण्यात अतिशय कुशल  होते. कला सादर करण्याच्या हेतूने एकदा आनंद फंदी व त्यांचे सहकारी होळकरशाहीत महेश्वरला गेले. अहिल्यादेवींच्या कार्यकाळात राजवाड्यात तमाशे किंवा तत्सम कार्यक्रम केले जात नव्हते, परंतू विन्मुख कोणी जाऊ नये म्हणून अनंत फंदी व त्यांच्या सहकाऱ्यांना परवानगी देण्यात आली. अनंत फंदी यांनी स्वतः रचलेले कवन अहिल्यादेवींच्या दरबारात सादर केले. अहिल्यादेवींनी संपूर्ण कवन ऐकले आणि अनंत फंदी यांना एक उपदेश दिला की, "तुम्ही ब्राह्मण असून अशा कर्मात कवित्व बुद्धी खर्च करितां त्यापेक्षा हीच कविता परमार्थ साधेल अशा तऱ्हेने कराल तर आपल्याबरोबर अन्य जनांचे हित होईल" या उपदेशावरून अहिल्यादेवींची परमार्थ विचारसरणी तर दिसतेच, पण हा सदुपदेश ऐकून अनंत फंदींची विचार मात्र पालटला. त्यांनी हाती असलेल्या डफाच्या कड्यावर तत्काळ बुक्की मारून ते कडे फोडले आणि पुढे कधी तमाशा न करण्याची प्रतिज्ञा घेतली. स्वतःची चूक उमगल्याने त्यांनी बिदागी स्वीकारण्यासही नकार दर्शविला व सहकाऱ्यांसह संगमनेरी परतले.

बरेच दिवस लोटले, अनंत फंदींचे तमाशे बंदच होते. संगमनेर गावात अनंतस्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वार्षिक उत्सव होत असे. त्या उत्सवात तमाशा करण्यासाठी तेथील गाव-पाटील व सर्व गावकऱ्यांनी  अनंत फंदींना अतिशय आग्रह केला. कदाचित आपण घेतलेल्या प्रतिज्ञेचा विसर पडल्याने त्यांनी त्यांच्या आग्राहाला मान देऊन उत्सवात तमाशा परत सुरु केला. परत फंदींचे तमाशे चालू लागले. तोच एके दिवशी अहिल्यादेवींची स्वारी पुण्यास जातेवेळी  संगमनेर येथे पोहोचली. रस्त्याच्या बाजूला लोकांची गर्दी पाहून अहिल्यादेवींनी तपास केला. अनंत फंदी यांचा तमाशा सुरु असल्याचे कळाले. अहिल्यादेवींनी त्या तमाशाच्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. अहिल्यादेवींची स्वारी आपल्याकडे येत आहे याची माहिती माहिती आनंत फंदींना मिळाली. त्यांना आपण पूर्वी अहिल्यादेवींसमोर घेतलेल्या प्रतिज्ञेची आठवण झाली. भितीने अनंत फंदी यांनी पुढील नर्तकांस खाली बसवले, मागे उभ्या असलेल्यांपैकी एकाला टाळ घेऊन उभे केले आणि एका सुंदर कीर्तनाला सुरुवात केली 'हरी तुझी मुरली घरघेणी…' तेवढ्यात अहिल्यादेवी तेथे पोहोचल्या, अहिल्यादेवींनीही कीर्तन पूर्ण ऐकले. कीर्तन संपताच अहिल्यादेवींनी अनंत फंदीचे कौतुक तर केलेच पण त्यांच्या किर्तनावर खुश होऊन त्यांना एक भरजरी पोषाख व सुवर्णाची कडी इनाम म्हणून दिली. इनाम देऊन देवींची स्वारी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. स्वारी गेल्यानंतर मात्र, अनंत फंदींनी अहिल्यादेवींचा 'तो' उपदेश व आपण करत असलेले कृती याचा विचार केला आणि स्वतःवर राग येउन त्यांनी तमाशाचा नाद कायमचा सोडला तो सोडलाच. जणू नियतीने अहिल्यादेवींच्या हाथूनच अनंत फंदींचे मत परिवर्तन व त्यांना समाज प्रबोधनाच्या मार्गावर आणण्याचे लिहून ठेवले होते. त्यानंतर मात्र ह्या कवीने प्रबोधनात्मक आणि उपदेशात्मक रचनेलाच महत्व दिले. त्यांनी कविता, पोवाडे ह्या साहित्य प्रकारांमध्ये अनेक साहित्य रचले. पुढे जाऊन याच कवीने समाजाला एखादी गंभीर गोष्ट कठोर भाषेत पटवून देणाऱ्या काव्यप्रकाराचे, अर्थात 'फटका' ह्या नवीन काव्यप्रकाराची सुरवात करून जणू अहिल्यादेवींच्या 'त्या' उपदेशाचे जीवनभर पालन केले. 'अनंत फंदींचे फटके' हे सर्वांना परिचयाचे आहेतच. त्यातील सर्वात गाजलेला म्हणजे - "बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको, संसारामधी ऐसा आपला, उगाच भटकत फिरु नको …"

सदैव लोककल्याणाचा विचार मनी असणाऱ्या अहिल्यादेवींच्या उपदेशांनी तसेच कृतींनी कित्तेकांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. त्यातीलच हे एक उदाहरण...

धन्यवाद
मिलिंद डोंबाळे (देशमुख)
संदर्भ - 'अनंत फंदी यांच्या कविता व लावण्या', मुद्रक- रा. रा. शंकर नरहर जोशी, १९२१. 

No comments:

Post a Comment