Sunday, June 11, 2017

हिरकणी धनगरची शौर्यगाथा - एक सत्यकथाच !

(मराठी साम्राज्याची राजधानी किल्ले रायगडावरील हिरकणी बुरुजाबद्दल 'सत्यकथा कि दंतकथा' या विषयाच्या अनुषंगाने लिहिलेले मत)

किल्ले रायगडावरील हिरकणी धनगरची शौर्यगाथा सर्व महाराष्ट्राला माहित आहेच. रायगडावर दूध विकण्यासाठी गेलेली एक माता उशीर झाल्याने गडावरच अडकून राहते. तान्ह्या मुलाच्या ओढीने रात्री एक कडा उतरवून गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या आपल्या घरी पोहोचते. छत्रपती शिवाजी महाराजांना हि गोष्ट कळताच ते तिला गडावर बोलावून तिचा सत्कार करतात, तो कडा भक्कम करुन घेतात आणि त्या बुरुजाला 'हिरकणी बुरुज' असे नाव देतात. हे त्या कथेचे सारांश रुप होय.

प्रथमतः एखादा लेखी पुरावा मिळत नाही म्हणून हिरकणी बुरुजाच्या वरील कथेला लगेच दंतकथेच्या रांगेत बसविणे थोडे आततायी होईल असे मला वाटते. इतिहासातील अनेक गोष्टींचे काही प्रत्यक्ष पुरावे मिळतात तर काही पुरावे अप्रत्यक्ष रुपात पाहावयास मिळतात. हिरकणीच्या साहसाची कथा हि जर खरंच दंतकथा असेल तर साहजिकच मनात खालीलप्रमाणे अनेक प्रश्न उपस्थित होण्यास वाव मिळतो - (०१) किल्ले रायगडावरील त्या बुरुजाला 'हिरकणी बुरुज' हेच नाव का दिले गेले ? (०२) किल्ले रायगडाजवळील वाळूसरे या गावाचे नामांतरण 'हिरकणीवाडी' असेच का करण्यात आले ? (०३) अठराव्या शतकातील कागदोपत्रात देखील 'हिरकणी' बुरुजाचा उल्लेख का असावा ? (०४) अनेक कवींना आणि शाहिरांना आपल्या लेखणीने 'हिरकणी'वर लिहण्याची व गाण्याची प्रेरणा का मिळावी ? (०५) शासनातर्फे मातांसाठी राबवल्या जाणाऱ्या अनेक पुरस्कारांचे अथवा योजनेचे नाव 'हिरकणी'च का ठेवले जावे ? (०६) पिढ्यानपिढ्या रायगडाच्या जवळ राहणाऱ्या गावकऱ्यांनी 'हिरकणीची' कथा अजूनही का सांगावी ?

जर ती दंतकथाच असती तर गेली २००-२५० वर्षे आणि आजही तिचा विविध रुपाने उल्लेख केला गेला नसता, या गोष्टीचा देखील येथे विचार करणे महत्वाचे आहे.

किल्ले रायगडावर १७७५-७६ साली करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या कामांत हिरकणी बुरुजाचेही दुरुस्तीचे काम करण्यात आले होते, असा संदर्भ ही उपलब्ध आहे. ('रायगडाची जीवनगाथा'-आवळसकर, पृष्ठ-१३२) याचाच अर्थ किल्ले रायगडावर १७७५ च्याही आधीही तो बुरुज हिरकणी नावानेच प्रचलित होता.

आपणांस इतिहासातील अनेक घटना तसेच साहित्य हे मौखिक स्वरुपात जतन केल्याची उदाहरणेही पाहावयास मिळतात. हिरकणीच्या साहसाला जरी अलीकडच्या साहित्यकारांनी म्हणावे तितके (काही कविता, पोवाडे आणि नाटके वगळता) प्रकाशमान केले नसले आणि लिखित साहित्यात जतन करुन ठेवले नसले तरी, किल्ले रायगडच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावकऱ्यांनी मात्र आपल्यातील साहसी मातेला मौखिक रुपात आजही जिवंत ठेवले आहे. किल्ले रायगडावर आजही तेथील गावकऱ्यांकडून आणि जवळपास सर्वच पर्यटक मार्गदर्शकांकडून हिरकणीची शौर्यगाथा पर्यटकांना सांगितली जाते.

आता काही प्रसिद्ध साहित्यकारांचे हिरकणी बुरुजाबद्दलचे मत पाहुयात;

(०१) "रायगड माय जिवाची गवळण बिनधोक | झोंक हिरकणी नांव ठेवुनी जाइ रोखठोक ||" - राम गणेश गडकरी ('श्री महाराष्ट्र गीत' या राम गणेश गडकरींच्या रचनेतून )

(०२) "उपलब्ध असलेल्या आणि पुण्याच्या ऐतिहासिक सरकारी दप्तरखान्यात जपलेल्या रुमालांत 'हिरकणीचा कडा', 'हिरकणी बुरुज', 'हिरकणीचा पहारा', इत्यादी शब्द असलेली अक्षरश: शेकडो अस्सल कागदपत्रे आज आपल्याला अभ्यासासाठी मिळतात. या हिरकणीच्या उल्लेखांवरून ही हिरा गवळणीची हकीगत वास्तव असावी, असे दिसून येते. महाराजांनी, हिरा गवळण ज्या भयंकर अवघड कड्यावरून उतरून गेली, त्या कड्याच्या माथ्यावर नव्याने भरभक्कम बुरुज बांधण्याची इमारत खात्याला आज्ञा दिली. हिराजी इंदुलकर सुभेदार, खाते इमारत यांनी हा बुरुज बांधला." - बाबासाहेब पुरंदरे ('रायगडची व्यथा' ह्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये १४ जून २००८ रोजी प्रकाशित झालेल्या लेखातून)

(०३) "रायगडावरील हिरकणी बुरुजाची कथा कोण विसरेल? हिरकणी ही धनगरच. अभेद्य अशा समजल्या जाणा-या रायगडावरील चोरवाटही तिला माहीत होती. छ. शिवाजी महाराजांनी तिचा यथोचित सन्मान करुन ती चोरवाट बंद करण्यासाठी बुरुज बांधला. तो आजही हिरकणी बुरुज म्हणून ओळखला जातो." - संजय सोनवणी  (संजय सोनवणी यांच्या ब्लॉगवर ०३ सप्टेंबर २०१२ रोजी प्रकाशित झालेल्या 'धनगर-गवळ्यांच्या अवनतीचा कालखंड' या लेखातून)

(०४) "The Hirkani Bastion is to the western side of the fort. Legend has it that a milkmaid, Hirkani, climbed down this precipice in order to reach her child and home, after the main gates had been closed for the night. Later when Shivaji heard of her feat he rewarded her and blocked the loophole by erecting a bastion. Looking at the sheer fall, it is difficult to believe that anyone could have climbed down from here." - मिलिंद गुणाजी ('Offbeat Tracks in Maharashtra' या पुस्तकातून, पृष्ठ -४२)

(०५) "गडाच्या सुरक्षिततेच्या व शत्रूच्या आक्रमणाच्या दृष्टीने हा सोपा मार्ग ठरू शकतो. हे हिरकणीमुळे महाराजांच्या लक्षात आले. महाराजांनी तो मार्ग तातडिने बंद केला. तेथे भरभक्कम बूरूज बांधण्याची आज्ञा दिली. हिराजी इंदुलकर यांनी हा बुरुज बांधला. छ.शिवाजी महाराजांनी त्यास हिरकणी बुरूज असे नाव दिले. आजही तो बुरूज हिरकणीच्या धाडसाची आणि मातृत्वाच्या अतुलनीय प्रेमाची साक्ष देतो." - होमेश भुजाडे ('धाडसी हिरकणी' या १४ मे २०१७ रोजी प्रकाशित झालेल्या लेखातून)

या व्यतिरिक्त, काही वर्षांपूर्वी हिरकणी या विषयावर एका इतिहास अभ्यासकाने लिहिलेल्या लेखात हिरकणीचे मूळ आडनाव 'हिरवे' असल्याचेही माझ्या वाचनात आले होते. भविष्यात अधिक संशोधन होऊन इतिहासातील या दुर्लक्षित मुद्द्याचे सत्यही समाजासमोर येईल अशी आशा आहे. कोणत्याही काल्पनिक, अंधश्रद्धात्मक तसेच चमत्कारिक गोष्टींचा उल्लेख नसणारी, एकाद्या मनुष्याला शक्य असणारी आणि मौखिक स्वरुपात जतनही केलेली हिरकणीची कथा आज अनेक बुद्धीजीवींनी (?) सत्यकथा म्हणून नाकारावी, याचे विशेष वाटते. असो... शेवटी ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे.

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
http://milind-dombale.blogspot.in/2017/06/blog-post_11.html

2 comments: