Thursday, June 15, 2017

आठवणींच्या हिंदोळ्यावर - ००२ (माझी तिरंदाजी)

प्रत्येक व्यक्ती जरी मोठा होत गेला, तरी त्याच्या बालपणीच्या आठवणी ह्या त्याच्या मनात कायम एक छोटेसे घर करुन राहत असतात. त्यात काही मजेशीर किस्से असतात, तर काही वेळा अज्ञानातून उध्दभवलेले रोमांचक प्रसंग असतात तर काही वेळा अजून काही... पण, अशा आठवणी त्या व्यक्तीच्या सोबत अखेरपर्यंत राहतात. ज्या ज्या वेळी अशा आठवणी आठवतात त्या त्या वेळी त्याचे मन भूतकाळात जाते आणि आठवणींनुसार भावनांचे रंग उधळू लागते. माझ्या बाबतीतही घडलेला असाच एक प्रसंग जो अजून मला घडला तसा आठवतो तो म्हणजे, मी माझ्या आईचा फोडलेला डोळा !

लहानपणी सर्वानाच अनेक छंद आणि खेळ खेळायची आवड असतेच. मला ही होती. छोटी-छोटी मातीची घरे बांधणे, बुद्धिबळ, क्रिकेटच्या खेळाडूंची कार्डे गोळा करणे, क्रिकेट खेळणे हे त्यापैकीच काही... ह्या खेळासोबत मी "काही दिवस" अजून एक खेळाला होता, तो म्हणजे धनुष्य-बाणाचा खेळ ! (काही दिवस हे अवतरण चिन्हांमध्ये का ठेवले हे पुढे कळेलच) इतर खेळाप्रमाणे त्याचीही गोडी होती. वेळूच्या पट्टीपासून दोरीने ताणून बनवलेला धनुष्य आणि काठीच्या सरळ तुकड्याचा बाण असे. काही अंतरावर थर्माकॉलचा एक तुकडा ठेवून त्यावर बाण मारले जात असत. पण, ह्या व्यतिरिक्त त्यातिल बाणाचे एक वैशिष्ट्य असे कि, मारल्या जागेत बाण घुसण्यासाठी त्याच्या टोकाला डांबराचा एक छोटा गोळा लावून त्यापुढे एक टाचणी टोचलेली असे. जेणे करुन टाचणीच्या पुढील टोकामुळे बाण त्या थर्माकॉल मध्ये घुसला जात असे. घरामागील बागेत माझा हा खेळ चालत असे. काहीवेळा मित्र असत काही वेळा एकटाच असे. एकंदरीत असा माझ्या खेळाची रुपरेषा होती.

असाच एकेदिवशी दुपारची झोप आणि अभ्यास संपवून, घरासमोरील अंगणात धनुष्य-बाणाचा हा खेळ खेळत होतो. आई आणि आमच्या घरात भाड्याने राहणाऱ्या पाटील कुटुंबातील काकू माझ्या मागे बोलत उभारल्या होत्या. थर्माकॉलच्या तुकड्यावर बाण मारण्यासाठी धनुष्याची दोरी ताणली होती. तेवढ्यात मागून आईची हाक ऐकू आली. आई काय म्हणत आहे हे पाहण्यासाठी मी ताणलेला धनुष्य-बाण तसाच धरुन मागे वळून पाहिले आणि तिच्या सोबत बोलू लागलो. पण तेवढ्यात धनुष्यातून ताणलेला बाण सुटला आणि तो थेट जावून नेमका आईच्या उजव्या डोळ्यातच घुसला. नेम नव्हता ना काही, पण बोलण्याच्या नादात सुटलेला बाण थेट डोळ्यात घुसला होता. बाणाला पुढे लावलेली टाचणी डोळ्यात घुसली होती. काय झाले याची कल्पना होती, पण करणार काय ?

आईजवळ उभ्या असणाऱ्या पाटील काकूंनी आईला घरात नेले. डोळ्यातून रक्ताची धार लागलेली. नाकातून देखील रक्त येत होते. वडिल ज्या शाळेत शिक्षक होते ती शाळाही जवळच असल्याने वडील देखील प्रसंग ऐकून शाळेतून लगेच आले. त्वरीत दवाखान्यात नेण्याची व्यवस्था झाली. बस स्थानकाजवळ असणाऱ्या डॉ. तंगडी (नेत्ररोगतज्ञ) यांच्या दवाखान्यात नेले गेले. डॉक्टरांनीही गांभीर्य ओळखून त्वरीत उपचार सुरु केला. डोळ्यातील बुबुळाच्या थोड्याच बाजूला, पांढऱ्या भागावर ती बाणाची टाचणी घुसली होती. जखम झाली होती. पण, सुदैवाने डोळा बचावला होता. अन्यथा, आईला एका डोळ्याला कायमचे मुकावे लागले असते. दोन टाके घालण्यात आले. मलम-पट्टी केली गेली. डॉक्टरही माझ्या 'पराक्रमाने' आश्चर्यचकित झाले होते. दवाखान्यातून निघून औषधे घेऊन आईसह आम्ही सर्वजण घरी आलो.

घरी आल्यावर भावाने तो धनुष्य-बाण मोडूनच टाकला. तसा मी ही गांगरून गेलो होतो. त्यात लहान आणि मी मुद्दाम केले नसल्याने मला कोणी रागाने काही बोलले नाही. आईची यथोचित सर्व काळजी घेण्यात आली. थोड्या दिवसातच आईच्या डोळ्यातील जखम भरुन आली. डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली. दुखणे थोडे दिवस होते पुन्हा तेही कमीकमी होत नाहीसे झाले. पण कॉलनीत आमचा 'पराक्रम' सर्वांना काळाला होताच. दादाचे मित्र 'लिंबाराम' (जागतिक दर्जाचा भारतीय तिरंदाज) म्हणून चिडवू लागले होते. दादाचा एक मित्र तर अजून देखील कधी भेटला तर लिंबाराम म्हणूनच बोलावतो. परंतू, त्या दिवसानंतर तो धनुष्य-बाणाचा खेळ थांबला, तो आजअखेर !

असा तो प्रसंग अजूनही आहे तसा आठवतो. कितीतरी दिवस-महिने-वर्षें ओलांडली तरी ह्या प्रसंगाची आठवण ताजी राहणार यात काही शंकाच नाही.

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)

No comments:

Post a Comment