Tuesday, November 26, 2013

किल्ले रायगडवरील हिरकणी बुरुजाची कथा…

मराठी साम्राज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडवरील प्रसिद्ध हिरकणी बुरुजाची सत्यकथा...


छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याच्या राजधानीसाठी किल्ले रायगड उभारला. १६७४ साली महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न झाला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ह्या किल्ल्याची बांधनी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय चांगली होती. २७०० फुट उंची असलेल्या ह्या गडावर दरवाज्यांखेरीज कोणताही येण्याजाण्याचा मार्ग नव्हता. असे म्हंटले जायचे की - 'रायगडाचे दरवाजे बंद झाले की, खालून वर येईल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी'. पण ह्या गोष्टीला अपवाद ठरणारी एक स्त्री म्हणजेच - 'हिरकणी' 

किल्ले रायगडाच्या खाली काही अंतरावर वाकुसरे (वाळूसरे) नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक धनगर व्यक्तीचे कुटुंब राहत होते. घरात त्या व्यक्ती समवेत त्याची आई, बायको हिरा व त्यांचे एक तान्हे बाळ राहत असे. घरातील दुभत्या गायी-म्हैशींचे दूध विकून मिळणाऱ्या पैश्यातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. त्याची बायको रोज सकाळी गडावरती दूध विकण्यास जात असे. एके दिवशी रोजच्याप्रमाणे हिरा गडावर दूध विकण्यास गेली, पण तिला त्या दिवशी काहीएक कारणाने दरवाजापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. ती गडाच्या दरवाजांजवळ आली, पण पाहते तर काय दरवाजे बंद झालेले होते. गडकऱ्यांना तिने फार विनंती केली, पण त्यांनी दरवाजे उघडण्यास नकार दिला. कारण सकाळी उघडलेले दरवाजे सूर्यास्तानंतर बंद झाले कि, ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडत असत. छत्रपतींची ही आज्ञा सर्वांना लागू होती. कोणालाही त्यासाठी मुभा नसे. पण हिराला आपल्या तान्ह्या बाळाची चिंता लागली होती. आईवाचून ते तान्हे बाळ रात्रभर कसे राहील, ह्या विचाराने त्या आईची चिंता वाढतच चालली. ह्या विचारातच हिराने किल्ल्याच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. अंधारात कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीव पणाला लावण्याच्या बरोबरीचे होते. कारण सर्वत्र खोल दऱ्या, दाट झाडे-झुडपे आणि त्यात अंधार. पण बाळाच्या प्रेमापोटी ह्या मातेने हा निर्णय घेतला. गडाच्या कड्यांचे निरीक्षण केले. एका कड्यावर येऊन पोहोचली आणि त्याच कड्यावरून खाली उतरली. खाली पोहोचूपर्यंत मात्र सभोवतालच्या झाडा-झुडपांमुळे अंगावर अनेक ठिकाणी ओरबडल्याने रक्त आलेले होते. त्याच अवस्थेत गड उतरून ती आई आपल्या घरी परतली. घरी परतताच पहिल्यांदा त्या आईने आपल्या बाळाला कुशीत घेतले. बाळाच्या दर्शनाने त्या आईला जो आनंद झाला, तो मात्र जखमांच्या वेदनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता.

ही घडलेली गोष्ट जेव्हा महाराजांना कळली, तेव्हा ते अत्यंत अश्यर्यचकित झाले. कारण शत्रूच्या सैन्यालाही दरवाजातून येण्या-जाण्या शिवाय मार्ग उपलब्ध नसणाऱ्या रायगडावरून एक स्त्री खाली कशी पोहोचली. हा प्रश्न महाराजांसहित सर्वांनाच अन्नुतरीत होता. महाराजांनी हिराला गडावर बोलावण्यास सांगितले. हिरा गडावर आली, ती आल्यानंतर महाराजांनी तिला ह्या सर्व घटनेविषयी विचारले असता, हिरकणीने महाराजांना घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला व आपल्या तान्ह्या बाळाला भेटण्यासाठी हा एकच मार्ग उपलब्ध होता असे सांगितले. हे ऐकून त्या शूर मातेचा महाराजांनी साडी-चोळी देऊन सन्मान तर केलाच पण ज्या कड्यावरून ती खाली उतरली त्या कड्यावर आईच्या प्रेमाची साक्ष म्हणून एक बुरुज बांधण्यात आला. तो बुरुज म्हणजेच रायगडावरील 'हिरकणी बुरुज'. त्याचबरोबर ती राहत असलेल्या गावाला तिचे नाव देण्यात आले. ते गाव म्हणजेच रायगडाजवळील 'हिरकणीवाडी'. सध्या रायगडावर जाण्या-येण्यासाठी बनवण्यात आलेला रोपवे (Ropeway) हा त्याच 'हिरकणीवाडी'तून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हिरकणीवर उपलब्ध असलेली प्रसिद्ध जुनी कविता येथे देत आहे.

रायगडावर राजधानी ती होती शिवरायांची ।
कथा सांगतो ऐका तेथील हिरकणी बुरुजाची ।

वसले होते गाव तळाशी वाकुसरे या नावाचे ।
राहात होते कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे ।

आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे ।
शोभत होते हिरा नाव त्या तडफदार घरवालीचे ।

सांज सकाळी हिरा जातसे दूध घेऊनी गडावरती ।
चालत होती गुजराण त्या नेकीच्या धंध्यावरती ।

एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली ।
ध्यानी आले नाही तिच्या कधी सांज टळूनी गेली ।

सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे ।
मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळ तान्हे माझे ।

हात जोडूनी करी विनवणी म्हणे जाऊद्या खाली मला ।
गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला ।

बाळाच्या आठवे झाली माय माउली वेडिपीसी ।
कडा उतरूनी धावत जाऊनी बाळाला ती घेइ कुषी ।

अतुलनीय हे धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले ।
साडी चोळी हिरास देऊनी प्रेमे सन्मानित केले ।

कड्यावरी त्या बुरूज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची ।
ऐकू येते कथा अजुनी अशी हिरकणी बुरूजाची ।

हिरकणीची ही शौर्यगाथा अजही रायगडावर सांगितली जाते आणि तो हिरकणी-बुरुज आईच्या प्रेमाची साक्ष देत आजही रायगडावर तटस्थपणे उभा आहे. एका शूर मातेची कथा सर्वांपर्यंत पोहोचावी एवढाच हा लेख लिहिण्यामागील स्वार्थ…

धन्यवाद
मिलिंद डोंबाळे

3 comments:

  1. मी आज पहिल्यांदा ही गोष्ट वाचली खरंच खूपच सुंदर आहे खरंच माझे डोळे भरून आले धन्य आहे ती आई
    मी भिलाई छत्तीसगडला राहतो

    ReplyDelete
  2. मन भरून येते जेव्हा कोणत्याही गड किल्या बद्दल वाचले तर.होते राजे होते मावळे म्हणून मिळाले स्वराज्य. धन्य आहोत आम्ही तुमचे ऋण कधीच फेडू शकत नाही जय जिजाऊ,जय शिवराय, जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  3. आज चा कोजागिरी पौर्णिमा चा दिवशी वीर माता हेच हिरकणी चा कौतुक करावा आणि सादर नमन 🙏💐🙏💐

    ReplyDelete